खोके पुरवणारी ‘ती’ व्यक्ती एकनाथ शिंदेंची खासमखास?

मुंबई | 20 जून 2022 राज्यात विधानपरिषदेची निवडणुक पार पडली आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या काही समर्थक आमदारांना सोबत घेत नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. आधी एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदारांनी बंडाचं बिगुल फुंकलं आणि शिवसेनेवरचं (Shivsena) संकट अधिकच गडद झालं.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा सुरत-गुवाहाटी-गोवा दौरा समोर आला आणि महाराष्ट्रातलं सरकार कोसळलंच. बंडादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलमधला आमदारांचा मुक्काम, येण्या-जाण्यासाठी चार्टर्ड प्लेनची सोय, यासगळ्यासाठी आलेला खर्च आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या सोयी-सुविधांसाठी आर्थिक मदत कोणी केली? अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक आजही शिंदे गटाला घेरतायत.

मात्र, आता बंडाच्या पाच महिन्यांनंतर शिंदेंच्या या बंडाचं गुपित उघड झालंय. बंडखोर आमदारांचा सुरत-गुवाहाटी दौरा, यासाठी आलेला खर्च, आमदारांना दिलेले खोके या सगळ्याचा धक्कादायक खुलासा आता शिवसेनेनं केलाय.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कोसळण्याच्या मार्गावर पोहोचली. शिंदे गटातील आमदारांनी या बंडासाठी उद्धव ठाकरेंनाच जबाबदार धरलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून शिवसेनेतील आमदारांच्या मागण्या दुर्लक्षित झाल्या. आमदारांचा निधी मंजूर झाला नाही, उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या भोवतालच्या वलयामुळे ते भेटलेच नाहीत, असे आरोप शिंदे गटातील आमदारांनी केले.

तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांना खोके मिळाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इतकंच नाही पण आता या खोक्यांची सोय कोणी केली याचा खुलासा शिवसेनेनं केलाय. सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे एका बांधकाम व्यवसायिकाचा मोठा हात होता. हा बिल्डर दुसरा तिसरा कोणी नसून एकनाथ शिंदेंचे खासमखास अजय आशर असल्याचा धक्कादायक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय.

नुकतंच ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय आशर या बिल्डरची नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या शिफारसीनं ही नियुक्ती करण्यात आल्याचं म्हटलं जात असतानाच आता सेनेनं हा नवा गौप्यस्फोट केलाय.

महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातले जाणकार, उद्योग क्षेत्रातले महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या सेनेनं केलाय.

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली, असा दावाही शिवसेनेनं केलाय.

महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार?, असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आलाय.

शिवसेनेच्या या दाव्यात किती तथ्यय हे तर येणारी वेळ सांगेल पण यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडालीये.

महत्त्वाच्या बातम्या-