Pune News | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कोकण कड्यावरून घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तलाठी म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र पारधी आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह 1200 ते 1350 फूट खोल दरीत आढळले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, यामागचं नेमकं कारण अजूनही अंधारात आहे.
एकाचवेळी गायब, अन् एकाच दरीत मृतदेह :
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. ते गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगीही गायब होती. ती त्यांच्या नातेवाईकांपैकी असल्याचे बोलले जात आहे. या मुलीच्या अपहरणाची तक्रारही 15 जून रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. (Pune News)
गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकण कड्यावर रामचंद्र पारधी यांची गाडी उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. याच गाडीजवळ एका चपलांचा जोडही आढळून आला. यामुळे गावकऱ्यांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली.
Pune News | 16 जणांच्या रेस्क्यू पथकाची कारवाई :
शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 सदस्यीय पथकाने अत्यंत कठीण अशा दरीत शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान, सुमारे 1200 फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला, तर आणखी खोल म्हणजे 1350 फूटांवर रामचंद्र पारधी यांचाही मृतदेह सापडला. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू आहे. (Pune News)
दोघांनी कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की अन्य कोणतं कारण यामागे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. रामचंद्र पारधी यांचं या मुलीसोबतचं नातं, दोघांच्या मृत्यूपूर्वीचा संपर्क, त्यांच्या फोन लोकेशनचे तपशील यांची चौकशी केली जात आहे.