Pune Crime News l पुणे जिल्ह्यात एक अत्यंत भयानक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका अठरा वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या करून त्याचे शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाचे शीर, धड, हात आणि पाय वेगवेगळ्या विहिरींमध्ये सापडल्याने पोलिसांसमोर गुन्ह्याचे मोठे कोडे उभे राहिले आहे.
तरुण बेपत्ता; काही दिवसांनी मृतदेह सापडला :
ही धक्कादायक घटना पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे घडली. 6 मार्च रोजी माऊली गव्हाणे हा 18 वर्षीय तरुण बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर येथे गेला होता. मात्र, त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर आठ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
दाणेवाडी गावातील एका विहिरीत दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा धड सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आज गावातील दुसऱ्या एका विहिरीत त्याचे शीर आणि हात-पाय सापडले. पोलिसांनी या शरीराच्या तुकड्यांची ओळख पटवली असता, तो बेपत्ता झालेला माऊली गव्हाणे असल्याचे निष्पन्न झाले.
Pune Crime News l पोलिस तपास सुरू; हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात :
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. एवढ्या अमानुषपणे हत्या करण्यात आली यामागे कोणते कारण आहे? हत्येचा मुख्य सुत्रधार कोण? याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी शक्य तितक्या दिशांनी तपास केला जात असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा अंदाज आहे.
या निर्घृण हत्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका विद्यार्थ्याची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्याने पालकांमध्ये देखील चिंता वाढली आहे. पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही संशयितांची चौकशी सुरू केली असून लवकरच या हत्येचा छडा लागेल, अशी अपेक्षा आहे.