आग्रा | शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये असं आपल्या न्यायदेवतेचं तत्व आहे. पण गेली 20 वर्ष एक निरपराधी व्यक्ती न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. विष्णू तिवारी असं या व्यक्तीचं नाव असून तो 20 वर्षांपासून बलात्काराच्या आरोपात तुरूंगात खडी फोडत आहे.
विष्णूकडे ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान द्यायला वकील नव्हता, केस लढायला पैसा नव्हता. त्यामुळे मी बलात्कार केलेला नाही असं अनेकदा त्याने ओरडून सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली त्यावेळी त्याचं वय 23 वर्ष होतं. दोन दशकं तुरूंगात राहून आता त्याची निर्दोष सुटका होणार आहे. मात्र या 20 वर्षात त्याचं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. हातात पैसे नसतील, ओळख नसेल तर निर्दोषत्व सिद्ध करायला किती आणि कसा वेळ लागेल सांगताच येणार नाही, याचं उदाहरण म्हणजे विष्णू तिवारी.
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत बातमी दिली आहे. 2000 साली विष्णू, त्याचे वडिल आणि त्याची दोन भावंड उत्तर प्रदेशातल्या ललितपूर गावात रहात होते. विष्णू त्याच्या वडिलांना मदत म्हणून छोटी-मोठी नोकरी करायचा. पण गावापासून 30 किमी अंतरावरच्या दुसऱ्या गावातल्या एका एस.सी महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केला म्हणून ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.2003 मध्ये त्याची आग्राच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. तिथे त्याचे वडिल भेटायला यायचे काही वर्षांनी तेही बंद झालं. त्यानंतर त्याला समजलं त्याच्या वडिलांचं आणि भावाचं दोघांचंही निधन झालं. वडिलांप्रमाणे त्याला भावाच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही.
दरम्यान, अखेर तुरुंग प्रशासनालाच विष्णूची केस लावून धरावी असं वाटलं आणि त्यांनी राज्याच्या कायदेविषयक सेवेला संपर्क केला. त्यांच्या मदतीने विष्णूची केस अलाहाबाद हायकोर्टात उभी राहिली. कोर्टाने पुन्हा सुनावणी घेत या प्रकरणी 28 जानेवारीला निकाल दिला. विष्णू तिवारी या प्रकरणात निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तिने स्वतः केस दाखल केलीच नव्हती. तिच्यावतीने तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने तक्रार केली होती. यासंदर्भातली एफआयआर सुद्धा तीन दिवसांनंतर दाखल करण्यात आली. त्यामध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या कुठल्याही जखमेच्या खुणा दिसल्याची नोंद नव्हती. अखेर या गुन्ह्यामागचा उद्देशही कोर्टाच्या लक्षात आला. कुठल्यातरी जमीन आणि मालमत्तेप्रकरणी दोन गटात वाद होता. त्यातूनच ही बलात्काराची खोटी तक्रार नोंदवण्यात आली होती. लवकरच कागदपत्रांची पूर्तता होऊन विष्णूला मुक्त करण्यात येईल असं आग्रा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही.के.सिंग यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण
कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे
“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”
ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?
केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड
Comments are closed.