Sonia Gandhi | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आले आहे. पोटासंबंधीच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
सोनिया गांधी या 78 वर्षांच्या आहेत आणि त्यांची प्रकृती मागील काही वर्षांपासून कमकुवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या रुटीन चेकअपसाठी गुरुवारी सकाळी 8:30 वाजता रुग्णालयात दाखल झाल्या. डॉक्टरांच्या एका विशेष पथकाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, आज त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
राज्यसभेत सहभागी, जनगणनेच्या मुद्द्यावर मागणी
13 फेब्रुवारी रोजी सोनिया गांधी संसदेत बजेट सत्राच्या कामकाजात सहभागी झाल्या होत्या. त्या राज्यसभेच्या कामकाजात सक्रिय होत्या आणि खाद्यान्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांबाबत सरकारकडे लवकरात लवकर जनगणना करण्याची मागणी केली होती. त्यांनी असा दावा केला होता की, देशातील 14 कोटी नागरिक खाद्यान्न सुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत.
भाजप-काँग्रेसमध्ये वाद, सोनिया गांधी यांच्यावर टीका
सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावरही टीका केली होती, ज्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपने त्यांच्या विधानाचा निषेध केला, तर काँग्रेसनेही त्यावर प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांची अचानक रुग्णालयात भरती होण्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आहे. (Sonia Gandhi)
Title : Sonia Gandhi Admitted to Sir Ganga Ram Hospital