Stamp Duty l राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा निर्णय घेत मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्याचा आदेश दिला आहे. शासकीय आणि शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक असलेले 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा फायदा :
या निर्णयामुळे आता प्रतिज्ञापत्रासाठी मोठ्या खर्चाची गरज राहणार नाही. नागरिक आणि विद्यार्थ्यांना केवळ साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळू शकते.
यामुळे दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आधी 3 ते 4 हजार रुपयांपर्यंतचा खर्च होत असे, मात्र हा निर्णय लागू झाल्याने तो पूर्णतः वाचणार आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Stamp Duty l मुद्रांक शुल्क कोणत्या दस्तऐवजांसाठी आवश्यक होते? :
जात पडताळणी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
शासकीय कार्यालयांमध्ये सादर होणारी प्रतिज्ञापत्रे
पूर्वी फक्त 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी जवळपास 250 रुपये खर्च येत असे. मात्र, अचानक हा खर्च 1000 रुपयांपर्यंत वाढल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. शिक्षणासाठी हा अतिरिक्त खर्च परवडणारा नसल्याने सरकारकडे त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत सरकारने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.