Sujay Vikhe | ऐन निवडणुकीत नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली आहे. यामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉँग्रेसकडून येथे रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तसेच, शहरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली. (Sujay Vikhe)
सुजय विखे यांच्यासमोरच भाजप नेत्याने टीका केल्याने त्यांनाही आता कॉँग्रेसकडून टार्गेट करण्यात येत आहे. या प्रकरणी महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त केला जातोय. याचदरम्यान सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील (Shalini Vikhe-Patil) यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे. आज त्या नगरमध्ये बोलत होत्या.
काय म्हणाल्या शालिनीताई विखे?
“ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील, तर सुजय विखे मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही. जशास तसे उत्तर देईल. आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाही. खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये. वसंतराव देशमुख यांच्याकडून गेलेल्या चुकीच्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे सुजय विखे यांनी निषेध केलेला आहे. मात्र, यापुढे कुणीही लोणी गाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला सोडणार नाही.”, असं शालिनीताई विखे-पाटील म्हणाल्या आहेत. (Sujay Vikhe)
पुढे त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. काही लोकांना चांगलं काम हे बघावलं जात नाही. त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहे. वसंत देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो. सुजय विखेंचे सर्व भाषण मी आई म्हणून ऐकत असते. आपल्या मुलाचे तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये, असे संस्कार आम्ही दिलेले आहे, असंही शालिनीताई विखे म्हणाल्या आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.
नेमकं प्रकरण काय?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल 25 ऑक्टोबररोजी सुजय विखे यांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असं वक्तव्य भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलं. यानंतर कॉँग्रेसकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला. देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Sujay Vikhe)