ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पालघर | ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती.

अखेर वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिकेच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली आहे.

सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली. आचार्य अत्रेंनीच त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’चा किताब दिला. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या त्यांच्या गाजलेल्या लावण्यांपैकी एक.

अनेक गाजलेल्या गाण्यांना आपला आवाज दिलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आले होते.

दरम्यान, काही शस्त्रक्रिया आणि वृद्धपकाळातील आजारपणामुळे सुलोचना चव्हाण यांची तब्येत खालावली होती. अखेर शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राची ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी अनंतात विलीन झाली.

महत्त्वाच्या बातम्या-