“ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”, सुप्रिया सुळेंची सरकारकडे थेट मागणी

Supriya Sule | पुणे कार अपघात प्रकरणी आता ससून रुग्णालय देखील चर्चेत आलंय. याच ठिकाणी आरोपी अल्पवयीन मुलाचे ब्लड टेस्टच्या नमुन्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार सातत्याने समोर येत आहे. आता पुणे अपघात प्रकरणातही रुग्णालयाने गलथान कारभार केल्याचा आरोप असून यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी सातत्याने ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवरच आता शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलंय. त्यांनी राज्य सरकारकडे याबाबत ट्वीट करत मोठी मागणी केली आहे. ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सुळे (Supriya Sule) यांनी केलीये.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे, असं ट्वीट सुळे यांनी केलंय.

वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते.शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

“शासकीय संस्था संशयाच्या भोवऱ्यात अडकणे..”

परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे. काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी. अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

News Title – Supriya Sule Demand To Government on Sassoon Hospital case

महत्त्वाच्या बातम्या-

RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

“छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही..”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग होणार तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींच्या क्रूझवर, जाणून घ्या फंक्शनचं पूर्ण वेळापत्रक