पुणे | भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे इंदापूर तालुक्यातील मौजे बोराटवाडी येथील लक्ष्मण सतू डोईफोडे यांना वयाच्या 45 व्या वर्षी आसाम राज्यात कर्तव्यावर असताना मंगळवारी वीरमरण आलं. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची बातमी कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून आपल्या पदावर कार्यरत होते. मंगळवारी गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली. यामध्ये दोन जणांना वीरमरण आलं. त्यात लक्ष्मण डोईफोडे यांचाही समावेश आहे. त्यांच्या निधनाची माहिती कळताच डोईफोडे परिवारावर आभाळ कोसळलं आहे. बोराटवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.
लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. यावेळी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता लक्ष्मण डोईफोडे यांचं पार्थिव त्यांच्या गावी बोराटवाडी येथे आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.
शेतकरी कुटुंबात लक्ष्मण डोईफोडे यांचा जन्म झाला होता. पण देशाप्रतीच्या निष्ठेने ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले आणि 26 वर्षांपासून कार्यरत होते, त्यांनी 3 वेळा सेवा वाढवून घेतली होती. ते दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या गावी बोराटवाडी येथे 25 दिवसांच्या सुट्टीकरता आले होते. कर्तव्यावर जाताना ते गावातील सर्व गावकऱ्यांना भेटून गेले होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
थोडक्यात बातम्या –
मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत
…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!
‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा
तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र, वाचा जसेच्या तसे
‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक
Comments are closed.