Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमुळे राज्यभर खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. (Santosh Deshmukh Case)
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो पाहून संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. या संदर्भात सुरेश धस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे.
स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.
संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही हैवानियत जिवंत राहिली तर कोणीही सुरक्षीत राहणार नाही.
त्यासाठी आत्तापर्यंत मी ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत तोपर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही. आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे, अशी पोस्ट सुरेश धस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, तो राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. (Santosh Deshmukh Case)
याच पार्श्वभूमीवर बोलताना सुरेश धस म्हणाले, “मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील आणि त्यांना घरी पाठवले जाईल, असा मला विश्वास आहे. कारण या घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. फक्त राजीनामा पुरेसा नाही, आरोपींना तातडीने शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्यात यावे, ही माझी मागणी आहे.”