Suresh Dhas | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना ‘आंतरराष्ट्रीय नेत्या’ म्हणून डिवचले आहे. “पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही, त्यामुळे त्यांना ट्रम्प, बायडेन, पुतीन किंवा जागतिक पर्यावरणविषयक प्रश्न विचारा,” असा खोचक सल्ला सुरेश धस यांनी दिला. (Suresh Dhas )
“बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका, ट्रम्प-बायडेनबद्दल विचारा”
सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझी विनंती आहे की, पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका. त्या आता जागतिक दर्जाच्या नेत्यांच्या गटात गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ट्रम्प, बायडेन, गाझा पट्टी, डेन्मार्क, जर्मनी किंवा जागतिक हवामान बदलावर प्रश्न विचारा. कारण बीड जिल्ह्याशी त्यांना आता काहीही घेणं-देणं राहिलेलं नाही.”
त्यांनी पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना सांगितले की, “बीडमध्ये इतकी मोठी घटना घडली, पण पंकजा मुंडे यांनी अद्यापही देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. संतोष देशमुख आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हे दोघेही भाजपचे बुथप्रमुख होते. भाजपसाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्याच्या बाबतीत पंकजा मुंडे असंवेदनशील भूमिका घेतील, असं कधी वाटलं नव्हतं,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडेंनी काय वक्तव्य केलं होतं?
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी माध्यमांनी त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्राविषयी प्रश्न विचारला. मात्र, त्या या प्रश्नांवर चिडल्या आणि म्हणाल्या, “मी पुण्यात आहे, पुण्याबद्दल विचारा. ”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “माझ्याकडे गृहखाते नाही. गृहखाते हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जलदगतीने निर्णय घेतला पाहिजे,” असं त्या म्हणाल्या होत्या. (Suresh Dhas )
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण आधीच गाजत असताना, आता भाजपच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यावर पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Title : Suresh Dhas Slams Pankaja Munde over beed murder case