Sushilatai Shivajirao Patil Nilangekar | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर (Sushilatai Shivajirao Patil Nilangekar) यांचे रविवारी रात्री 8.30 वाजता लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांचे अंत्यसंस्कार सोमवारी, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सिंदखेड येथील शेतात होणार आहेत.
निलंगेकर कुटुंबातील आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड-
सुशीलाताई निलंगेकर या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर (Ashokrao Patil Nilangekar), डॉ. शरद पाटील निलंगेकर (Dr. Sharad Patil Nilangekar) आणि महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर (Vijaykumar Patil Nilangekar) यांच्या मातोश्री होत्या.
तसेच, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर (Rupatai Patil Nilangekar) यांच्या त्या सासू आणि माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे आणि जावई असा मोठा परिवार आहे.
संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित-
निलंगा तालुक्यातील बामणी धानोरा (Bamani Dhanora) गावातील शेतकरी अप्पाराव धानुरे (Apparao Dhanure) यांच्या कन्या असलेल्या सुशीलाताई यांचा विवाह 1951 मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत झाला. आपल्या पतीच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी नेहमी खंबीर साथ दिली. त्या प्रेमळ, आदरातिथ्यशील आणि कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून प्रसिद्ध होत्या.
शेती आणि घराचा सक्षम सांभाळ-
सुशीलाताई यांनी घरातील तसेच शेतीच्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रभावीपणे सांभाळल्या. त्यामुळे डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना सार्वजनिक आणि राजकीय जीवनात मोठे योगदान देता आले. त्यांच्या समर्पणामुळे निलंगेकर कुटुंबाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले.
अखेरचा श्वास लातूरमध्ये-
अलिकडच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्री ८.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्या सर्वांना ‘आईसाहेब’ या नावाने ओळखल्या जात होत्या.