Swargate Rape Case l पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याच्याविरोधात तपास अधिक घट्ट होत चालला आहे. 893 पानी आरोपपत्र, डीएनए रिपोर्ट (DNA Report), सीसीटीव्ही फूटेज, गुगल सर्च हिस्ट्री आणि लैंगिक चाचणीच्या निष्कर्षांमुळे आरोपीला सुटका मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे.
893 पानी आरोपपत्र, 82 साक्षीदार आणि घटनास्थळीचे पुरावे :
25 फेब्रुवारी रोजी पहाटे स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर दोन वेळा अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी दत्ता गाडे (datta gade) याला पोलिसांनी 70 तासांनंतर त्याच्या मूळ गावातून अटक केली. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 52 दिवसांतच 893 पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे.
या आरोपपत्रात 82 साक्षीदार तपासण्यात आले असून, पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय, घटनास्थळी करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांमधून गाडेचा घटनास्थळी उपस्थितीचा थेट आणि परिस्थितीजन्य पुरावा मिळाला आहे. पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्टरी तपासून आरोपीच्या मनोवृत्तीचा मागोवा घेतला आणि सीसीटीव्ही फूटेजमधून त्याची हालचाल सिद्ध केली.
Swargate Rape Case l लैंगिक अहवाल, डीएनए पुरावे आणि कोर्टात अडचणीत आलेला आरोपी :
पोलिसांनी जमा केलेल्या वैज्ञानिक पुराव्यांमध्ये घटनास्थळी आढळलेले आरोपीचे केस आणि त्याच्या शर्टाचे बटण महत्त्वाचे ठरले आहेत. रासायनिक विश्लेषणातून हे दोन्ही पुरावे आरोपी गाडे याच्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ससून रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीत गाडे हा लैंगिकदृष्ट्या पूर्णतः सक्षम असल्याचा अहवाल दिला आहे.
या सगळ्या बाबींमुळे आरोपीच्या बाजूने कुठलाही बचाव शक्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे तपास करत आरोपीविरोधात सर्व बाजूंनी पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आरोपी दत्ता गाडेचा ‘गेम ओव्हर’ झाला असल्याचं स्पष्ट संकेत न्यायालयीन वर्तुळातून मिळत आहेत.