Swargate Bus Stand Rape l स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी या घटनेवरून महायुती सरकारला धारेवर धरत पुण्यासारख्या मोठ्या शहरातही महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांचा कसून तपास, आरोपीसाठी १ लाखाचे बक्षीस :
घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी फरार आरोपी दत्ता गाडे (Dattatray Gade) याच्या शोधासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
स्वारगेटसारख्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागात अशा प्रकारची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Swargate Bus Stand Rape l बसचा दरवाजा का उघडला? तांत्रिक तपासणी सुरू :
या घटनेत पीडितेला शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेनंतर बसच्या दरवाज्याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बस चालकाने बस लॉक केली होती. मात्र, गाडीचा एअर प्रेशर उतरल्याने दरवाजा आपोआप उघडला असण्याची शक्यता आहे. तांत्रिक विभागाने सांगितले की, गाडी बंद असताना आणि एअर प्रेशर कमी झाल्यास लॉक केलेला दरवाजा उघडू शकतो.
स्वारगेट बसस्थानकात अवैध कृत्यांचा अड्डा? :
घटनेनंतर काही राजकीय कार्यकर्त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक धूळखात पडलेल्या एसटी बसमध्ये मद्याच्या बाटल्या, कंडोमच्या पाकिटांचा खच आढळून आला. यावरून बसस्थानकातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पीडितेची प्रकृती स्थिर, आरोपी अजूनही फरार :
बलात्कारानंतर पीडित तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला “फलटणला जाणारी बस इथे लागत नाही, पलिकडे लागते,” असे सांगून दिशाभूल केली. तिचा विश्वास संपादन करत त्याने तिला शिवशाही बसमध्ये नेले.
पीडितेने बसमध्ये अंधार असल्याचे सांगितल्यावर त्याने तिला मोबाईलची लाईट लावून बघायला सांगितले. ती आत जाताच त्याने दरवाजा बंद करून तिचा गळा आवळला आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.