Pune Swargate News | पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई सुरू केली असून, आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगाने काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता बस चालकाचा जबाब समोर आला असून, या जबाबानंतर स्वारगेट एसटी डेपो व्यवस्थापनावरही चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे.
बस चालकाने जबाबात नेमकं काय सांगितलं?
स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बस चालकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मंगळवारी पहाटे 3.40 वाजता स्वारगेट आगारात पोहोचलेली ही बस सोलापूर मार्गावरील विनावाहक (कंडक्टरशिवाय) बस होती. त्यानंतर चालकाने ती बस स्वारगेट बस स्थानकातील रसवंतीगृहासमोर उभी केली होती.
चालकाने (Pune Swargate News) दिलेल्या जबाबानुसार, सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने “मी या बसचा वाहक आहे,” असे सांगत तरुणीला बसमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. बस चालकाच्या या जबाबामुळे आता डेपो व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुरक्षा यंत्रणांवर कारवाईची शक्यता-
या घटनेनंतर स्वारगेट एसटी डेपोच्या व्यवस्थापनावर चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून डेपोतील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून, पहाटेच्या वेळी कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांचीही चौकशी केली जाणार आहे.
आरोपी अद्याप फरार-
या प्रकरणाचा मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीसाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
स्वारगेटसारख्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागात ही घटना घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कठोर करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि महिला संघटनांकडून केली जात आहे.