Swargate rape case l स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत देसाई यांना ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवले. यानंतर देसाई अधिकच आक्रमक झाल्या आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“आरोपीला अटक झालीच पाहिजे” :
तृप्ती देसाई यांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त करत विचारले, “लोकशाहीत आवाज उठवायचा अधिकार नाही का? मला कशासाठी अटक करताय? आरोपीला अटक करा!” त्या पोलीस व्हॅनमध्ये असतानाही त्यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
देसाई यांनी सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका करत पुढे म्हटले, “पुण्यातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आरोपीला अटक झाली नाही, ५० तास उलटले तरी सरकार निष्क्रिय आहे. आता राज्यात नेमकं काय चाललंय, हे विचारण्यासाठी आम्ही मंत्री योगेश कदम यांना भेटायला आलो होतो. पण त्यांनी भेट न दिल्यामुळे आम्ही त्यांच्या गाडीचे दरवाजे वाजवले. त्यासाठी आम्हाला अटक केली जाते, पण आरोपी मात्र मोकाट फिरतो!”
Swargate rape case l “आरोपीला तातडीने अटक करा” :
तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला. “आरोपीला अटक का होत नाही? सरकार त्याच्या आत्मसमर्पणाची वाट पाहत आहे का? आम्हाला जबरदस्तीने अटक करता, पण आरोपीसाठी मात्र वेगळा न्याय का? जर लवकरच त्याला अटक झाली नाही, तर आम्ही कायदा हातात घेऊ!” त्या पुढे म्हणाल्या, “राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली जातात. संतोष देशमुख प्रकरण असो किंवा स्वारगेट प्रकरण, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? लाखोंच्या पगारावर पोलीस बसलेत, पण साधा आरोपी सापडत नाही! जर पोलिसांना हे जमणार नसेल, तर आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्ही निकाल लावतो.”
तृप्ती देसाईंनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारत, “आज महिलांना भीती वाटतेय, आपल्या लेकीबाळींवर अशी वेळ येऊ नये म्हणून त्या रात्रभर जाग्या आहेत. महिला पोलीस कॉन्स्टेबल्स, उद्या तुमच्या मुलींवर असं झालं तर तुम्ही गप्प राहाल का?” असा थेट सवाल केला. या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.