Swargate rape case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीच्या बहाण्याने आरोपीने तिला बसमध्ये नेऊन जबरदस्ती केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण पुणे आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणातील आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) असे असून तो सध्या फरार आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या मागावर 13 पथके तैनात केली असून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांची आणि मित्रमंडळींची चौकशी सुरू केली असून अजूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपासादरम्यान आरोपीच्या इतर कृत्यांची माहिती समोर आली असून त्याने याआधीही एका मैत्रिणीचा छळ केल्याचे उघड झाले आहे.
स्वारगेट येथे अत्याचार करण्याआधी आरोपी आपल्या ओळखीतील एका मैत्रिणीचा सातत्याने छळ करत होता. त्याने तिला वारंवार फोन आणि मेसेज करून त्रास दिला. एवढेच नव्हे तर तिच्या मैत्रिणीशी ओळख करून दे, तिला पटवून दे, तिच्याशी संबंध जुळव, अशा मागण्या तो तिच्याकडे सातत्याने करत होता. पीडित मैत्रिणीने याला विरोध केला असतानाही तो तिचा पाठलाग करत राहिला. या धक्कादायक प्रकाराबाबत त्या मैत्रिणीनेच माहिती दिली आहे. त्यामुळे स्वारगेट बलात्कार प्रकरणाला आता एक नवा ट्विस्ट मिळाला आहे.
आरोपीचे विकृत कृत्य, पोलिसांनी ठेवली बक्षीस घोषणा
या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचे लव्ह मॅरेज झालेले असून त्याला एक मुलगाही आहे. तरीदेखील तो इतर महिलांवर वाईट नजर ठेवत होता. आपल्या मैत्रिणीला त्रास देण्यापासून ते थेट स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचार करण्यापर्यंत त्याने गंभीर गुन्हे केले आहेत. मंगळवारी पहाटे या विकृतीच्या भरात त्याने स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केला.
सध्या आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी 13 पथके तैनात केली आहेत. तसेच, आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Title : Swargate Rape Case Police Hunt for Accused