Swargate Rape Case | स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांना टार्गेट करून लूटमार करत असे, असा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. (Swargate Rape Case)
आरोपीविरोधातील गंभीर गुन्हे उघड
दत्तात्रय गाडे याच्या विरोधात पुणे ग्रामीणमधील शिरूर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन, तर सुपा आणि कोतवाली पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे. यातील एक गुन्हा विनयभंगाचा आहे, तर उर्वरित गुन्हे लूटमारीचे आहेत. तो एकट्या महिला प्रवाशांना वाहनाने निर्जनस्थळी नेऊन धमकावत असे आणि त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम हिसकावून घेत असे.
दत्ता गाडेचे कारनामे उघड
दत्ता याने २०१९ मध्ये नगरहून पुण्याला जाणाऱ्या एका महिलेला एसटी स्थानकातून चारचाकीत बसवून निर्जनस्थळी नेऊन गळा दाबून तिचे दागिने हिसकावले होते. तर दुसऱ्या एक घटनेत त्याने नगर बसस्थानकात पुण्याला जाणाऱ्या महिलेला ‘पुणे, पुणे’ असा आवाज देऊन सहप्रवासी म्हणून गाडीत बसवले, मात्र नंतर निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिची लूट केली. तर, नीरा येथे जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेपाशी जाऊन तिला ‘चौफुला येथे सोडतो’ असे सांगून गाडीत बसवले आणि नंतर चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करून दागिने लुटले. (Swargate Rape Case)
भाजीविक्रेत्या महिलेला अश्लील मागणी
इतकंच नाही तर त्याने एकाभाजीविक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर चारचाकी थांबवून तिला शरीरसुखाची मागणी केली होती. सदर
महिलेने संतप्त होऊन आरोपीच्या गाडीवर दगड फेकला, त्यानंतर तो तेथून पळून गेला. या सर्व घटनांमधून त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोण कसा होता. ते स्पष्ट होतंय.
दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे.