Tara Bhavalkar l दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे. “आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदींच्या विधानावर पुनरुच्चार :
लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या जन्माविषयी भाष्य करत, “माझा जन्म जैविक नाही, मला ईश्वराने त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे,” असे विधान केले होते. या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि टीका झाली होती.
Tara Bhavalkar l संत साहित्याच्या माध्यमातून अप्रत्यक्ष टीका :
डॉ. भवाळकर यांनी आपल्या भाषणात संत साहित्याचा संदर्भ देत मोदींच्या जैविक जन्मावरील विधानाचा खरपूस समाचार घेतला.
त्या म्हणाल्या, “शिवला तर विटाळ होतो आणि स्त्रीलाही विटाळ होतो. निसर्गाने दिलेली मासिक पाळी तिचीच आहे, पण त्यालाही विटाळ म्हणायचं. पण संत कवयित्रींनी १३व्या-१४व्या शतकातच या विचारांचा भंडाफोड केला आहे.”
“स्त्री मुक्तीचे विचार संत कवयित्रींनी मांडले” :
संमेलनात बोलताना डॉ. भवाळकर यांनी संत कवयित्रींनी लिंगभेद आणि समाजातील चुकीच्या संकल्पनांविरोधात मांडलेले विचार अधोरेखित केले.
त्या म्हणाल्या, “आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशा संकल्पना १३-१४व्या शतकातील संत कवयित्रींनी मांडल्या आहेत. त्या जातीच्या स्त्रिया जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि भाषेवरचं प्रभुत्व दिसून येतं.”
राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात प्रतिक्रिया :
डॉ. तारा भवाळकर यांच्या या वक्तव्यामुळे साहित्य संमेलनात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.