ठाकरे-आंबेडकर युती फायद्याची की तोट्याची?

मुंबई| वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात सोमवारी युती झाली. काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी ठाकरेंसमोर(Uddhav Thackeray) युतीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानंतर कित्येक दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर अखेर काल बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्यसाधून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी ही युती जाहीर केली. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे कोणतेही नेते तिथं उपस्थित नव्हते.त्यामुळं या युतीचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल का?, तसेच ही युती आगामी काळात येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महत्वाची ठरेल का?, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवशक्ती आणि भिमशक्ती हे समीकरण यशस्वी ठरेल का?, याचा आढावा घ्यायचा झाला तर शिवसेनेसाठी मुंबई हा बालेकिल्ला आहे. पण आता शिवसेनेतील दोन गट पाहाता शिवसेनेची मतही आता विभागली आहेत. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईत आंबेडकर विचारांचीही एक मोठी मतपेढी आहे. पण ही मतपेढी अनेक नेत्यांमध्ये विखुरलेली आहे. त्यातली त्यात आता बोलायचं झालं तर मुंबईत प्रकाश आंबेडकर जास्त ताकदवान की भाजपला पाठिंबा असणारे रामदास आठवले जास्त ताकदवान हा मुद्दा उपस्थित होतोय.

वंचित बहुजन आघाडी आणि रिपाई या दोन्ही पक्षाची राजकीय कारकिर्दी पाहता रामदासा आठवलेंचा ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहरी भागांत काहीसा प्रभाव दिसून येतो. तसेच आठवलेंच्या पक्षाला विविध निवडणुकींमध्ये मर्यादित यश मिळालेले दिसते. मुंबई महापालिका निवडणुकीतही आठवले जिंकून येत नसले तरी अनेक मते घेऊन समोरच्याची अडचण ते ठरतात. आता याला आठवलेंचंच वक्तव्य तंतोतंत लागू होतंय बघा. आम्ही निवडूण येत नाही पण , पण कोणाल निवडूण आणायचं आणि कोणाला पाडायचं हे मात्र ठरवतो. यालाच आपल्या बोली भाषेत म्हणायचं झालं तर आठवले मतं खाण्याचं काम करतात. एकंदरीत आठवले मुंबईत भिमशक्तीची मत घेण्यास यशस्वी ठरू शकतात.

आता आंबेडकर यांनी आपला पक्ष फक्त अकोल्यातून बळकट केल्याचं साफ दिसत आहे. पण अकोला सोडून उर्वरित महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचा पक्ष अजून जास्त कमाल दाखवू शकला नाही. हे सगळं पाहता आठवलेंकडून भिमशक्तीची मतं आंबेडकरांकडं वळवणं थोडं अवघड ठरू शकतं.

आता दुसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होईल. उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं होतं की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल काय. यावर ठाकरेंनी राष्ट्रवादी, काॅंग्रेससोबत चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हा जुना वाद नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण पवार जुनं सगळं विसरून आमच्यासोबत येतील असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केलाय.

पण शरद पवारांना या युतीबाबत विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, मला या युतीबद्दल काही माहित नाही, मी या भानगडीत पडत नाही. पण आंबेडकरांच्या वक्तव्यावरून साफ दिसतंय की ते राष्ट्रवादीसोबतही हातमिळवणी करायला तयार आहेत. आता शेवटी हे राजकारण आहे, कधीही काहीही घडू शकतं. म्हणूनच येणारा काळाच या युतीचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे दाखवून देईल.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More