140 किलो वजनाचा गोलंदाज सगळ्या बांगलादेशला पुरुन उरला, लावला धक्कादायक निकाल!
ढाका | वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगलेल्या शेवटच्या रोमांचकारी सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव केला आहे. बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर असताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामना खेचून आणला. या विजयात ‘जगातला सर्वात वजनी गोलंदाज’ रहकीम काॅर्नवेल याचं महत्वाचं योगदान राहिलं.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करत 409 धावासंख्या उभारली. त्याला प्रतिउत्तर म्हणून बांगलादेशला फक्त 293 धावा करता आल्या. यात रहकीम काॅर्नवेलने बांगलादेशचे महत्वाचे फलंदाज टिपले. 116 धावांची आघाडी घेतल्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला. दुसरा डावात वेस्ट इंडिज संघाला फक्त 117 धावा काढता आल्या.
बांगलादेशचा दुसरा डाव रंगतदार स्थितीत होता, दुसऱ्या डावात बांगलादेशला 231 धावांची गरज होती. बांगलादेशच्या फलंदाजांनी चिवट झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू रहकीम काॅर्नवेलने फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. 140 किलोच्या रहकीमने या सामन्यात सलग 30 षटकं टाकली आणि बांगलादेशचे 4 गडी तंबूत पाठवले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी रहकीम काॅर्नवेलचे कौतुक केलं आहे.
अखेरचा फलंदाज मैदानात आला तेव्हा बांगलादेशला 43 धावांची गरज होती. मेहंदी हसन आणि अबु जावेद यांची झुंज अपयशी ठरली आणि वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव केला. दोन सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशला 2-0 अशी धूळ चारली. बांगलादेशला त्यांच्याच देशात पराभवाचा सामना करावा लागला, दोन्ही डावात मिळून 9 गडी बाद केलेल्या रहकीम काॅर्नवेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
Comments are closed.