‘तुरूंगात असताना मला मारण्याचा प्रयत्न झाला होता’, राऊतांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे तुरूंगात होते. परंतु तुरूंगात असताना त्यांच्यासोबत काय घडलं, याचा गौप्यस्फोट नुकताच राऊतांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे.

राऊत म्हणाले की, तुरूंगात असताना मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता. पण यावर सविस्तर योग्य वेळ आल्यावर बोलू असं म्हणत त्यांनी देशात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती आहे आणि देशात लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप भाजपवर केला.

पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्येबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, वारिसेंच्या मृत्यूमागं राजकीय षडयंत्र आहे. वारिसे यांच्या हत्येमुळं सरकारची बेअब्रू झाल्याची टीकाही राऊतांनी केली.

वारिसेंच्या मृत्यूच्या तपासासाठी सरकारनं एसआयटी नेमली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, जरी सरकारनं वारिसेंच्या मृत्यूच्या तपासासठी एसआयटी नेमली असली तरी हा तपास निपक्षपाती होईल का, अशी शंका आहे.

ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं त्या ठिकाणच्या पेट्रोल पंपचे आणि आजूबाजूचे तीन-चार सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसंकाय पडले?, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. तसेत वारिसे यांच्या कुटुंबाला सरकारनं 50 लाखांची मदत करावी, अशी मागणीही राऊतांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या