Udayanraje Bhosale | छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला आहे. टीझरमधील लेझीम खेळण्याच्या सीनवरून शिवप्रेमींनी आक्षेप घेतला असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून आक्षेपार्ह सीन चित्रपटातून वगळण्याचे आवाहन केले आहे.
उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली भूमिका
उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधताना म्हटले की, “मी टीझर पाहिला आहे आणि त्यावरून वाद सुरू झाल्याचे मला दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लोकांच्या मनात विशेष आदर आणि भावना आहेत. त्यांना आपण देवाच्या स्थानी मानतो, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींवरून वाद निर्माण होणे योग्य नाही. तुम्ही दिग्दर्शन चांगले केले आहे, पण कथेबाबत इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक वाद टाळता येईल. हा चित्रपट भावी पिढीला दाखवणे गरजेचे आहे.”
इतिहास विसरून चालणार नाही
“आपण आपला इतिहास विसरून चालणार नाही. इतिहास हा आपला शिक्षक आहे आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या तरुणाईला आपला इतिहास समजणे फार गरजेचे आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणे तरुणांसाठी महत्त्वाचे आहे. इतिहासावर फारसे कोणी लक्ष देत नाही, त्यामुळे हा इतिहास पुढच्या पिढीला कळणे आवश्यक आहे,” असेही उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले.
वादग्रस्त सीन हटवण्याचे आवाहन
“चित्रपटातील लेझीमच्या सीनवरून वाद सुरू झाला आहे. ज्या कुणाचा यावर आक्षेप असेल तो दूर करून चित्रपट लवकर प्रदर्शित करावा, अशी माझी आणि सर्वांचीच इच्छा आहे. बोलणे सोपे असते, पण करणे तितकेच कठीण असते. काही लोक करतात आणि काही लोक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. याचा निषेध करण्यापेक्षा तुमच्याशी बोलून मार्ग काढणे मला योग्य वाटले. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचा विचार करून तो सीन चित्रपटातून काढून टाका. तसे केल्यास काही अडचण येणार नाही,” असे आवाहन उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) लक्ष्मण उतेकर यांना केले.
दिग्दर्शकांची प्रतिक्रिया
लक्ष्मण उतेकर यांनी उदयनराजेंच्या सूचनांचे स्वागत केले. ते म्हणाले, “३ फेब्रुवारीपर्यंत चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम पूर्ण होईल. चित्रपटाचे VFX आणि डबिंगचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. आपले महाराज आणि राजा कसे होते हे जगाला कळावे हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजांचा मान आणि प्रतिष्ठा राखून मी प्रत्येक सीन चित्रित केला आहे.”
Title : Udayanraje Bhosale called the director of the film Chhava