शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाचे शांत, संयमी, नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडामुळे आख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसलाय. शिंदेंनी केलेलं बंड जितकं अनपेक्षित आहे तितकंच ते धक्कादायक आहे. शिवसेनेला बंड नवं नाही. याआधीही शिवसेनेमधून बंड करून अनेक नेते बाहेर पडले. मात्र यावेळी परिस्थिती खूपच वेगळीये…यावेळी शिवसेना विरूद्ध शिंदेसेना असं चित्र तयार झालंय. याआधी राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे यांसारखे नेते शिवेसेनेतून बाहेर पडले. पण पक्षातून बाहेर न पडता पक्षप्रमुखांनाच विरोध करत, बंड करत थेट पक्षावरच हक्क सांगणारं कोणी असेल तर ते फक्त शिंदेच असतील.
शिवसेनेत हे असं होण्याची ही पहिलीच वेळ. मात्र याआधीही 1969 मध्ये देशात असंच काहीसं घडलं होतं. ते म्हणजे 1969 साली…..
1969 मध्ये काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली होती. त्यावेळी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्याच पक्षातून त्यांच्याच नेत्यांनी हकलून लावलं होतं. 12 नोव्हेंबर 1969 रोजी काँग्रेसच्या मजबूत सिंडिकेटने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. अखेरीस पक्ष फुटला आणि इंदिरा गांधींनी काँग्रेस आर आर म्हणून ओळखल्या जाणार्या प्रतिस्पर्धी संघटनेची स्थापना केली.
इंदिरा गांधी यांनी फक्त नवी काँग्रेसची स्थापन केली नाही, तर तीच खरी काँग्रेस असल्याचं दाखवूनही दिलं किंवा सिद्ध केलं म्हणा. पंतप्रधानपद कायम ठेवत त्यांनी काँग्रेसच्या सिंडिकेटला पाडलं आणि सरकार पण वाचवलं. यातून इंदिरा गांधी यांचं राजकीय चातुर्य नक्कीच देशाला पाहायला मिळालं.
आपल्याच लोकांनी केलेल्या विरोधानंतर इंदिरा गांधी ज्या प्रकारे परिस्थितीला सामोरं गेल्या, लढल्या हे वाखाण्याजोगं आहे. इंदिरा गांधींनी त्यावेळी बंडखोर काँग्रेस हीच खरी काँग्रेस म्हणणाऱ्यांना त्यांच्या राजकीय चातुर्याने नंतर चांगलाच धडा शिकवला. आणि स्थापन केलेल्या काँग्रेसला खरी काँग्रेस सिद्ध करून दाखवलं.
आत्ता राज्यात सुरू असलेलं राजकारण पाहता तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती थोडीफार सारखीच म्हणावी लागेल. तेव्हा काँग्रेस कुणाची?, कुठली काँग्रेस खरी? काँग्रेस, इंदिरा गांधी संपल्या अशा चर्चा झाल्या. आताही तेच होतंय. गेल्या चार दिवसांमध्ये खरी शिवसेना कोणती? ते आता शिवसेना कोणाची? अशा चर्चा सुरू झाल्यात.
सध्या शिंदेंनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना सध्याचं महाविकास आघाडी सरकार तर वाचवायचं आहेच. तसेच पक्षांतर्गत वाद मिटवून डॅमेज कंट्रोल देखील करायचंय. हे सध्या उद्धव ठाकरेंपुढे असलेलं मोठं आव्हानच म्हणावं लागेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. माघ आणि फाल्गुन मासात झाडाची पाने गळतात. पण चैत्र महिन्यात झाडाला नवी पालवी फुटते, त्याप्रमाणे शिवसेना पक्ष पुन्हा बहरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींचं राजकारण, त्यांच्या कामाची स्टाईल, त्यांच्यासोबत झालेले कटूगोड प्रसंग पाहिले आहेत. त्यांच्यासमोर इंदिरा गांधींची तीच प्रेरणा असावी. बाळासाहेबांची उर्जा आणि निष्ठावान शिवसैनिक तर त्यांच्या संगतीला आहेतच पण राजकारणात संघर्ष हा कधी संपत नसतो….
थोडक्यात बातम्या-
‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले
शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई
‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया
‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी
गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर
Comments are closed.