“गद्दारांना आणि गद्दारांच्या राजकीय बापांना आव्हान आहे, निवडणूक घ्या”
मुंबई | बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीने (VBA) युतीची घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केलीये.
आम्हाला गृहित धरून अडीच-तीन वर्षे राजकारण केलं गेलं. शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. मला हे पण सांगितलं होतं की शरद पवार कसे फसवतात हा लौकिक तुम्हाला ठाऊक आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
जे राजकारण असं चाललं आहे की दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलाद सत्तेवर येऊ पाहते आहे ती गाडून टाकण्याची गरज आहे, असं आक्रमक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान असणार आहे. कुणाच्या कुठल्या जागा? हे आमचं ठरायचं आहे. मात्र आमच्यात सामंज्यस आहे आम्ही त्या प्रमाणे योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.