Top News महाराष्ट्र मुंबई

“जे डॉक्टर्स योद्धे बनून लढत आहेत त्यांचं मी कौतुक करतो अन् वचन देतो की….”

मुंबई |  आज जागतिक डॉक्टर्स डे आहे. आजच्याच दिनाचं औैचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समस्त डॉक्टरांचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. डॉक्टर्स डे ला मुख्यमंत्र्यांनी समस्त डॉक्टरांसाठी खास ट्विट केलं आहे. ट्विटमधून डॉक्टरांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

जे डॉक्टर्स आपल्यासाठी योद्धे बनून लढत आहेत, त्यांचे मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासाठी जी लढाई लढत आहेत, त्यात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला सहकार्य करत आहोत आणि करू, हे वचन त्यांना देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

 

दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील तमाम डाॅक्टरांना पत्र लिहून त्यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  कोरोनाचं संकट गडद असताना डाॅक्टर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकार यांच्या समन्वयातून कोरोनाची लढा दिला जात आहे.

राजेश टोपेंनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात-

“आज तुमचा दिवस.. डॉक्टर्स डे.. त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

“गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर, तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत. नागरिक काळजी घेताना दिसताहेत. त्याची तीव्रता वाढत नाहीये.”

“डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.”

“तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास 90 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. या संकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात.आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.”

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

“श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा”

आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….

‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या