Santosh deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. या प्रकरणाला आता तीन महीने उलटले आहेत. मात्र, अजूनही सर्व आरोपींना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मस्साजोग ग्रामस्थ यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. (Santosh deshmukh Murder Case)
आज (26 फेब्रुवारी) या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनात मस्साजोग ग्रामस्थांनी 7 मागण्या केल्या आहेत. या सात मागण्यांमध्ये उज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट काय?
“बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.”, असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान, मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज दूसरा दिवस
मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली असून बाकी 6 मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेला त्वरित शोधून अटक करावी, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा, वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा, अशा या इतर मागण्या आहेत. (Santosh deshmukh Murder Case)