Automated Chargeback | यूपीआयद्वारे (UPI) केलेले व्यवहार पूर्ण न होणे, व्यवहार अयशस्वी होणे, इंटरनेटची समस्या (Internet Issue) यामुळे ग्राहकांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. हे पैसे परत मिळावे यासाठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ (Automated Chargeback) प्रणाली देशभरात लागू करण्यात आली आहे. स्वयंचलित चार्जबॅक प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाल्याने युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
पैसे कसे परत मिळणार?
व्यवहार अयशस्वी होणे किंवा पैसे अडकल्यास आता युजरला अनेक दिवस थांबावे लागणार नाही. अशा स्थितीत आता पैसे परत मिळावे यासाठी पूर्वीसारखी बँकेकडे तक्रार करण्याची गरज नाही. तुमच्या बँकेकडून चार्जबॅकच्या विनंतीवर तत्काळ प्रक्रिया केली जाईल. ही प्रक्रिया आता स्वयंचलित करण्यात आली आहे. यामुळे रिफंडची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल. पैसे त्वरित तुमच्या खात्यात जमा होतील.
चार्जबॅक (Chargeback) आणि रिफंडमध्ये (Refund) फरक काय?
चार्जबॅक (Chargeback) आणि रिफंड (Refund) या दोन्ही प्रक्रिया ग्राहकांकडून झालेल्या व्यवहाराचे पैसे परत मिळवण्यासाठी केल्या जातात, परंतु दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक असतो.
रिफंड: ग्राहकाला यासाठी सेवा देणाऱ्या एजन्सीकडे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.
चार्जबॅक: यामध्ये संबंधित ग्राहकाला त्याच्या बँकेकडे अर्ज करून झालेल्या व्यवहाराची तपासणी आणि रकमेची परतफेड करण्याची विनंती करावी लागते.
चार्जबॅक का केला जातो?
कोणत्याही प्रकारचा व्यवहार कोणत्याही कारणामुळे अपूर्ण राहिला तर त्याचे पैसे ग्राहकांना परत दिले जातात. सामान्यपणे कोणतीही तांत्रिक अडचण येणे किंवा फसवणूक झाल्याच्या स्थितीत ग्राहकाला पैसे परत केले जातात. यालाच चार्जबॅक असे म्हणतात.
इंटरनेट समस्येमुळे, अडचणीमुळे व्यवहार पूर्ण न होणे, एकाच व्यवहाराचे वारंवार पैसे कट होणे किंवा फसवणुकीमुळे गेलेले पैसे परत मिळवताना चार्जबॅक प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. (Automated Chargeback)
तक्रार कोठे करावी?
यूपीआय (UPI) किंवा नेट बँकिंगद्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (transfer) झाल्यानंतर तुम्हाला याची तक्रार नोंदवता येते. टोल फ्री क्रमांक १८००१२०१७४० वर कॉल करून या व्यवहाराची माहिती द्यावी.
News Title : UPI Automated Chargeback System Implemented