Uttarakhand Avalanche | उत्तराखंडमधील चमोली (Chamoli) जिल्ह्यातील माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी रस्ता मोकळा करत असताना हिमकडा (Avalanche) कोसळल्याने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (Border Roads Organisation (BRO)) ५७ कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत ३२ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.
बचावकार्य वेगाने सुरू
माणा गावाजवळ रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सुरू असताना सकाळी ८ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. उर्वरित २5 कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
भारतातील शेवटचे गाव
समुद्रसपाटीपासून ३२०० मीटर उंचीवर असलेले माणा हे गाव भारत-तिबेट सीमावर्ती भागातील शेवटचे गाव आहे. हे गाव बद्रीनाथपासून (Badrinath) अवघ्या ३ किमी अंतरावर आहे.
चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरागढ आणि बागेश्वर जिल्ह्यांत २४०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी हिमकडा कोसळण्याचा इशारा चंडीगडमधील डिफेन्स जिओइन्फर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने (Defence Geoinformatics Research Establishment) गुरुवारी दिला होता.
मदतकार्य सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याशी चर्चा करून, बचावकार्याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले की, “हिमकडा कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कामगारांना वाचवण्यासाठी मदत पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत.”
Title : Uttarakhand Avalanche 57 Workers Trapped 32 Rescued