“लाडक्या बहिणींच्या नावावर मतं मिळवली आता त्याच असुरक्षित, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस

Pune | स्वारगेट (Swargate) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनं देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. या घटनेनं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना घडणे हे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का असल्याचे सांगत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महिलांच्या सुरक्षेवर सरकार अपयशी?

वर्षा गायकवाड यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुंबई आणि पुणे ही शहरे महिलांसाठी सुरक्षित मानली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली असून, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते, पण आता हे शहर ड्रग्ज आणि गुन्हेगारी टोळ्यांचे केंद्र बनले आहे. पहाटेच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार होतो, यावरून एसटी महामंडळ, स्वारगेट स्थानक प्रशासन आणि पुणे पोलिसांचा बेफिकीर कारभार उघड झाला आहे,” असे त्या म्हणाल्या.

त्यांनी पुढे संताप व्यक्त करत सांगितले, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात एका तरुणीवर अत्याचार होतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेवर सरकार गांभीर्याने पावले उचलत नाही, याचा हा मोठा पुरावा आहे.”

शक्ती कायद्याचे काय झाले?

वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी तयार केलेल्या शक्ती कायद्याबद्दलही भाष्य केले. “महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला होता, मात्र आजपर्यंत त्या कायद्याला मान्यता मिळालेली नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात, त्यावर चर्चा होते, मात्र त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही,” असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते सोडावं!

वर्षा गायकवाड यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, “राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे रोखण्यात गृह विभाग अपयशी ठरला आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी गृह मंत्रालयाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

भाजपा सरकारवर टीका करत त्या म्हणाल्या, “महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर बोलून मतं मिळवणाऱ्यांनी आता जबाबदारी घ्यावी. ज्या ‘लाडक्या बहिणींच्या’ मतांवर सत्ता मिळवली, त्याच बहिणी आज असुरक्षित आहेत. सरकारने केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्षात कठोर पावले उचलावीत,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

English Title: Varsha Gaikwad Demands Fadnavis’ Resignation Over Swargate Rape Case

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .