Yogesh Kadam statement l स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, या प्रकरणावर सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी यासंदर्भात धक्कादायक वक्तव्य करत सांगितले की, “घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आसपास १० ते १५ लोक उपस्थित होते. मात्र, पीडितेने कोणताही विरोध केला नाही, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना संशय आला नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करण्याची संधी मिळाली.”
“महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह” :
या वक्तव्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर तीव्र टीका होत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन किती गंभीर आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. “पीडितेने विरोध केला नाही, म्हणून गुन्हा घडला,” असे वक्तव्य केवळ आरोपीचे कृत्य लपवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल अनेक महिला संघटनांनी उपस्थित केला आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अजूनही फरार आहे, पण पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले आहे. त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येईल.”
दरम्यान, सरकारने सीसीटीव्ही यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले आहे. भविष्यात एआय (AI) आणि फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हेगारांना ओळखण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Yogesh Kadam statement l “महिलांना सुरक्षिततेची हमी मिळेल का?” :
या घटनेनंतर पुण्यात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली आहे. “आरोपीला लवकर अटक झाली नाही, तर आम्ही कायदा हातात घेऊ,” असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी यापूर्वीच म्हटले होते. सरकार आणि पोलिसांकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.