बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंचा अपघात की घातपात?, ‘ही’ प्रश्न अनुत्तरीतच

मुंबई | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटेंच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र हळहळला. रविवारी सकाळी रस्ते अपघातात विनायक मेटेंचं दु:खद निधन झालं. रस्ते अपघातात विनायक मेटेंनी जीव गमावला आणि त्यांच्या या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. दोन दिवस उलटले पण विनायक मेटेंच्या मृत्यूबाबतची काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ रविवारी मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विनायक मेटेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला आणि तपासणीनंतर डॉक्टरांनी मेटेंना मृत घोषित केलं.

मेटेंच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि उभ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला. मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईकडे निघाले होते. मेटेंसोबत गाडीत चालक आणि सुरक्षारक्षकही होते. पण खालापूर टोलनाक्याच्या जवळ असलेल्या बोगद्यात जाताना एका ट्रकने मेटेंच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की मेटेंच्या कारच्या एका बाजूचा भाग अक्षरश: चकनाचूर झाला.

पाच वाजून पाच मिनिटांनी अपघात झाला आणि सहा वाजून वीस मिनिटांनी मेटेंना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा पल्स नव्हते, बीपीही नव्हता आणि ईसीजीमध्येही फ्लॅट लाईन दिसून आली. पण त्यांना आणलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. तर ब्रेनस्टेम इंजुरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.

ही प्राथमिक माहिती रविवारी समोर आली पण त्यानंतर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमुळे हे प्रकरण अधिकच किचकट होत गेलं. मेटेंच्या ड्रायव्हरने दिलेली माहिती आणि अगदी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी उपस्थित केलेल्या संशयामुळे मेटेंच्या अपघाताला नवं वळणं लागलंय.

विनायक मेटेंच्या मृत्यूच्या वेळेबद्दल ज्योती मेटेंनी आक्षेप घेतलाय. आम्हाला कळवण्यात आलेली अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष अपघाताची वेळ यामधल्या टाईम गॅपची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीये.

इतकंच नाही तर अपघात झाल्याचं कळताच मी पाऊण तासात मुंबईतून कामोठे रुग्णालयात पोहोचले. मी स्वत: डॉक्टरय. वैद्यकीय निकषांप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चेहरा लगेच पांढारफटक पडत नाही, असंही ज्योती मेटे म्हणाल्या.

मेटें साहेबांना कामोठे रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्त वाहत होतं. तेव्हाच मी माझ्या भावाला म्हणाले की, ही घटना पाऊण तासापूर्वी घडलेली नाही. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. ही गोष्ट खूप विचित्र असल्याचे ज्योती मेटेंनी म्हटलंय.

हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. तेव्हा आमच्यापासून काहीतरी लपवले जात आहे, असे वाटत होते. कदाचित तसे नसेल. आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूची नेमकी वेळ कळेलच, असंही ज्योती मेटे म्हणाल्या.

मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याने अपघातानंतर मेटेंना जवळपास एक तास कसलीही मदत मिळाली नसल्याचा दावा केला. तर दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच पुढील काही मिनिटांत आम्ही घटनास्थळी दाखल झालो, असं पोलिसांनी सांगितलं.

त्यात विनायक मेटेंच्या सहकाऱ्याचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला. 3 ऑगस्टला मेटेंसोबत प्रवास करणारे अण्णासाहेब मायकर यांनी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या आमचा पाठलाग करत असल्याचा दावा केला.

मेटेंच्या मृत्यूच्या वेळेसोबतच ड्रायव्हरच्या भूमिकेवरही ज्योती मेटेंनी संशय व्यक्त केलाय. ड्रायव्हरकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरूये. या सगळ्यातली एक कडी मिसिंग असून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटेंनी केली.

तर मराठा आरक्षणाची खंबीरपणे लढाई लढणारे अशी विनायक मेटेंची ओळख होती. मराठा समाजाच्या बुलंद आवाज असणाऱ्या मेटेंच्या मृत्यूवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनीपण संशय व्यक्त केलाय.

समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने, अशी भावना दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.

विनायक मेटेंचं वय हे अवघं 52 वर्षांचं होतं. त्यामुळेच हे वय जाण्याचं नव्हतं. ज्योती मेटेंनी आक्षेप घेतलेली अपघाताची वेळ, वैद्यकीय मदत मिळण्यात मेटेंना झालेला उशीर आणि ड्रायव्हरची संशयास्पद भूमिका. मेटेंच्या मृत्यूबद्दलचे असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरीतच आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनायक मेटेंच्या यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. चौकशीत अपघात की घातपात यावरून पडदा उठणार की या प्रकरणाला नवं वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणारे.

थोडक्यात बातम्या-

Google चा कर्मचाऱ्यांना झटका; कंपनीने घेतला मोठा निर्णय

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

‘आपल्या देशाचं नाव बदलून…’; ‘या’ खेळाडूच्या पत्नीने नरेंद्र मोदींकडे केली मागणी

सोनं झालं स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More