700 वर्षे जुन्या जागेवर विरानुष्काचं लग्न, एका व्यक्तीचा खर्च 1 कोटी

इटलीच्या टस्कनीमध्ये एका अलिशान रिसॉर्टमध्ये 11 डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाहसोहळा पार पडला. इटलीमध्ये हे ठिकाण असलं तरी दूर शहराच्या बाहेर एकांतात हे ठिकाण आहे. ही जागा सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये हे ठिकाण बंद ठेवलं जातं, मात्र खास विराट-अनुष्काच्या लग्नासाठी हे ठिकाण खुलं करण्यात आल्याचं कळतंय. 

विराट-अनुष्कानं आपल्या लग्नासाठी इटलीच का निवडलं असा प्रश्न विचारला जातोय. अनेकजण तर भारतात जागा नव्हती का? असाही प्रश्न विचारत आहेत. मात्र हे लग्न इटलीला होण्यामागे अनुष्काचा हट्ट असल्याचं कळतंय. 3 वर्षांपूर्वी अनुष्कानं हार्पर मासिकाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तीनं आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. डेस्टिनेशन वेडिंग केलं तर विनयार्डसारखी जागा आपली पसंत असेल, असं अनुष्कानं सांगितलं होतं. 

विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा ते मिलानमध्ये लग्न करणार असल्याचं कळत होतं. मात्र हा अंदाज खरा ठरला नाही. दोघांनी मिलानपासून 4 तासांच्या अंतरावर असलेलं टस्कनी हे ठिकाण आपल्या लग्नासाठी निवडलं. दक्षिण इटलीमध्ये हे शहर आहे. ही एक ऐतिहासिक जागा आहे. 

टस्कनी शहरापासून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणाला Borgo Finocchieto या नावाने ओळखलं जातं. 13 व्या शतकात वसलेल्या या गावात 5 व्हिला आहेत.  Finocchieto या इटालियन शब्दाचा अर्थ गाव असा होतो, तर Borgo म्हणजे ऑर्किड… 2001 साली ही जागा सध्याच्या मालकाने खरेदी केली, त्याला ही जागा सध्याच्या सुंदर जागेत रुपांतरीत करण्यासाठी तब्बल 8 वर्षे लागल्याचं सांगितलं जातं. 

एकावेळी याठिकाणी 44 लोक राहू शकतात. 22 खोल्या याठिकाणी आहेत. हेच कारण असावं की ज्यामुळे विराटने आपल्या मित्रांना तसेच क्रिकेटपटूंना आपल्या लग्नासाठी निमंत्रित केलं नसावं. त्यांना थेट रिशेप्शनचं निमंत्रण देण्यात आलं आहे. अनुष्कानं व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे तिचं लग्न झालं कारण याठिकाणाहून फ्लोरेंस एक तर रोम दोन तासांच्या अंतरावर आहे. 

700 वर्षे जुनी जागा असल्याने या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. लग्नासाठी ही जागा एकदम परफेक्ट मानली जाते. मोठमोठे स्टार सुट्ट्या घालवण्यासाठी या जागेचा वापर करतात. नुकतंच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या जागेवर आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला होता. 

फोर्ब्सच्या क्रमवारीनूसार टस्कनीच्या या व्हिलाला जगातल्या 20 सर्वात महागड्या जागांपैकी एक मानलं जातं. एका माणसाला या व्हिलामध्ये एक आठवडा रहायचं असेल तर 1 कोटी रुपये मोजावे लागतात. एक रात्रच घालवायची असेल तर 6 लाख 50 हजार ते 14 लाख रुपये मोजावे लागतात. 

आता विचार करा विराट-अनुष्काला लग्न किती रुपयांना पडलं असेल?