बच्चू कडू आणि नाशिकच्या आयुक्तांमध्ये नेमकं काय काय घडलं?

नाशिक | नाशिकच्या आयुक्तांवर हात उचलल्याप्रकरणी अटक झालेले आणि जामीन मंजूर झालेले प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि आयुक्त यांच्यातील संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे कोण काय काय बोललं याचा खुलासा झालाय.

Bacchu Kadu - बच्चू कडू आणि नाशिकच्या आयुक्तांमध्ये नेमकं काय काय घडलं?

-१९९५ चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात का आला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू प्रहारच्या शिष्टमंडळासोबत आयुक्तांसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते.

-नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बसले होते

-अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजाणी का झाली नाही?, तसेच अपंगांचा राखीव ३ टक्के निधी खर्च का केला जात नाही?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी आयुक्तांना विचारला.

-प्रहारने दिलेल्या निवदनाला पालिकेने उत्तर दिलं नाही, असाही बच्चू कडू यांचा आरोप होता.

-अभिषेक कृष्ण यांनी निवेदनाला उत्तर दिल्याचं सांगितलं मात्र अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी का झाली नाही? याचं स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. 

bacchu jamin 1 - बच्चू कडू आणि नाशिकच्या आयुक्तांमध्ये नेमकं काय काय घडलं?

 

-तुम्ही आमच्या डोक्यावर उभे राहिला आहात, असं आयुक्तांनी बच्चू कडूंना म्हटलं. त्यावर डोक्यावर उभं राहिलं तर काय बिघडलं?, असा सवाल बच्चू कडूंनी विचारला.त्यावर आयुक्तांनी नाही होऊ शकत, असं उत्तर दिलं.

-यावर बच्चू कडूंनी ‘आम्हाला आठवण करायची वेळच पडली नाय पाहिजे, कायदा आहे १९९५ चा…’, असं आयुक्तांना सुनावलं.

-त्यावर आयुक्तांनी, ‘किती खर्च झालाय आणि झाला नसेल तर आत्ता शासनानं बनवायला सांगितलेल्या  आराखड्याचं काय झालं?, असा प्रश्न सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना विचारला. यावर, आत्ताचा आराखडा तयार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

-बच्चू कडूंनी यावर मागच्या वर्षीच्या आराखड्यावर प्रश्न विचारला. यावर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बच्चू कडूंना मध्येच थांबवलं.

Bacchu kadu jamin - बच्चू कडू आणि नाशिकच्या आयुक्तांमध्ये नेमकं काय काय घडलं?

 

-माझी आयुक्त अपंग कल्याण यांच्यासोबत चर्चा झाल्याचं तसेच त्यांच्याकडून अहवाल मागवला असून तुम्हाला काय पाहिजे ते पालिका द्यायला तयार आहे, असं आपण त्यांना सांगितल्याचं अभिषेक कृष्ण यांनी सांगितलं. 

-आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उत्तरावर आमदार बच्चू कडू संतापले. तुम्हाला शासनाने अधिकार दिलेत तर अपंग कल्याण आयुक्तांचा इथे काय संबंध, असा सवाल बच्चू कडूंनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांना विचारला. तसेच ३ टक्के खर्च कुठे करायचा याचा शासन निर्णय आहे, मग अपंग कल्याण आयुक्तांचं मार्गदर्शन घ्यायचा प्रश्न येतोच कुठे, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

-मागील वर्षी अपंगावरचा खर्च केला नाही, त्यांच्यावर कारवाई का करत नाही? तसेच कायदा असताना तुम्ही खर्च का करत नाही? असा सवाल बच्चू कडूंनी विचारला. त्यावर आम्ही आम्हाला पाहिजे ती कारवाई करणार, असं थातूरमातूर उत्तर आयुक्तांनी दिलं.

bacchu jamin - बच्चू कडू आणि नाशिकच्या आयुक्तांमध्ये नेमकं काय काय घडलं?

-यावर ही बोलायची पद्धत नाही, असं बच्चू कडूंनी आयुक्तांना सांगितलं. दरम्यान, आमची यांच्या संदर्भात अपंग आयुक्तांसोबत मिटींग झाल्याचं अभिषेक कृष्ण यांनी सांगितलं. त्यावर उपकार केले का? असा प्रतिप्रश्न बच्चू कडूंनी विचारला.

-त्यावर तुमची बोलायची पद्धत आता चुकतेय, असं आयुक्त अभिषेक कृष्ण म्हणाले. आयुक्तांच्या बोलण्यानं बच्चू कडू संतापले. तू चल उठ इथून, शहाणपणा नको शिकवू, असं म्हणत बच्चू कडूंनी आयुक्तांच्या कानाखाली लगावण्याचा प्रयत्न केला.

-आमदार बच्चू कडू यांच्या या कृतीनंतर हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बच्चू कडूंना धरुन ठेवलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एकच गलका केल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी हॉलमधून काढता पाय घेतला. 

दरम्यान, या गोंधळानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी बच्चू कडूंना अटक केली, मात्र त्यांना जामीन मिळाला.

पाहा या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा