Heat Wave | राज्यभरात तापमानात मोठी वाढ होत असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मुंबई, ठाणे, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आगामी 4-5 दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय? :
एखाद्या भागात तापमान अचानक 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट (Heat Wave) म्हणतात. जर ही वाढ 6.4 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल, तर त्याला तीव्र उष्णतेची लाट मानली जाते.
हवामान विभागाच्या निकषांनुसार:
– मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास
– डोंगराळ भागात तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास
– समुद्रकिनारी भागात तापमान 37 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास…त्यास उष्णतेची लाट प्रवण क्षेत्र मानले जाते.
– सलग दोन दिवस तापमान 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवल्यास तिसऱ्या दिवशी उष्णतेची लाट अधिकृतपणे जाहीर केली जाते.
Heat Wave l उष्णतेच्या लाटेचा परिणाम :
उष्णतेची लाट केवळ तापमानवाढीपुरती मर्यादित नसते, तर ती मानवी आरोग्यावर मोठा परिणाम करते. शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा असफल झाल्यास उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका असतो.
उष्माघात हा गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग असून, शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास तो घडू शकतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.
उष्माघाताची प्रमुख कारणे :
– प्रखर उन्हात जास्त वेळ राहणे
– उष्ण हवामानात शारीरिक श्रम करणे (शेतीकाम, बांधकाम, खेळ इ.)
– पुरेशा पाण्याचे सेवन न करणे
– लहान मुले, वयोवृद्ध आणि दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना अधिक धोका
उष्माघाताची लक्षणे:
– घाम येणे थांबणे
– चक्कर येणे आणि थकवा जाणवणे
– डोकेदुखी, मळमळ, उलट्या
– हृदयाचे ठोके वाढणे
– भान हरपणे किंवा बेशुद्धावस्था
राज्यात तापमान झपाट्याने वाढत असल्याने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास उष्माघात आणि इतर तापमानवाढीमुळे होणाऱ्या समस्यांपासून संरक्षण मिळू शकते. त्यामुळे हवामान विभागाच्या सुचनांचे पालन करा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.