देश सविस्तर

गुजरातमध्ये भाजपला हादरा, नेमकं काय घडतंय?

गुजरातमध्ये काँग्रेसचं कडवं आव्हान मोडून काढत भाजपनं सत्ता राखली खरी, मात्र आता खातेवाटपावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले नितीन पटेल नाराज झालेत. त्यांनी बंडाचं निशाण फडकावल्याचं कळतंय. गुजरातमध्ये नितीन पटेल यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वेगवान राजकीय घडामोडी घडतायत.

नेमकं काय आहे प्रकरण?-

नितीन पटेल हे गुजरात भाजपमधील मोठं नाव आहे. गुजरातमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा असताना नितीन पटेल यांचं नाव आघाडीवर होतं. पटेल आंदोलन पेटलेलं असतानाही नितीन पटेलांना मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. मात्र त्यावेळी ऐनवेळी भाजपनं विजय रुपानी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. यावेळीही तसंच झालं मुख्यमंत्रिपदासाठी नाव आघाडीवर असतानाही भाजपनं पुन्हा एकदा विजय रुपानींनाच संधी दिली. 

नितीन पटेलांनी मुख्यमंत्रिपद न मिळणं फारसं मनावर घेतलं नाही. भाजपनं त्यांना उपमुख्यमंत्री केलं. मात्र खातेवाटप करताना त्यांना हवी ती खाती देण्यात आली नाही. 

काय हवंय नितीन पटेल यांना?

नितीन पटेल यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पण ते पद न मिळणाऱ्या नेत्यांना अर्थातच चांगली खाती मिळावीत, अशी अपेक्षा असते. नितीन पटेल यांना गृह आणि शहर विकास मंत्रालय ही खाती हवी आहेत. मात्र ती त्यांना मिळाली नाहीत. सोबतच महसूल आणि वित्तही त्यांना देण्यात आलं नाही. त्यांच्या गळ्यात पडली रस्ते, आरोग्य, शिक्षा अशी खाती. त्यामुळे नितीन पटेल चांगलेच नाराज झालेत. इतके की त्यांनी अद्याप आपल्या पदांचा कार्यभारही स्वीकारलेला नाही. 

हार्दिक पटेलची ऑफर-

नितीन पटेल नाराज असल्याचं कळताच हार्दिक पटेलने संधी साधली. त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफरच हार्दिकने दिली. 10 आमदारांना सोबत घेऊन या मी तुमच्यासाठी काँग्रेसशी बोलतो. तुम्हाला हवं ते पद देऊ, असं हार्दिकने म्हटलंय. तसेच मी आणि संपूर्ण पाटीदार समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी घोषणाही हार्दिकनं करुन टाकली.

मुख्यमंत्री विजय रुपाणींचं मौन-

राज्याच्या राजकारणात एवढी मोठी उलाढाल सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मात्र मौन धारण करणंच पसंद केलं. अहमदाबादमध्ये फुलांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांनी त्यांना याबाबत छेडलं मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. मला यावेळी फुलांबद्दलच प्रश्न विचारले जायला हवेत, असं त्यांनी हसत सांगितलं. 

नितीन पटेल काय म्हणाले?

नितीन पटेल यांच्या नाराजीची बातमी आल्यानंतर त्यांनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण दिलं. सत्तेसाठी मी लढत नाहीये, मला फक्त मान सन्मान मिळावा, अशी माझी इच्छा आहे, असं नितीन पटेल यांनी म्हटलंय. अमित शहांसोबत या मुद्द्यावर बोलणं झालंय, सध्यातरी पक्ष सोडण्याचा विचार नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

10 आमदारांसह नितीन पटेल पक्ष सोडणार?

हार्दिकच्या ऑफरनंतर 10 आमदारांसह नितीन पटेल भाजपला रामराम करणार, अशी चर्चा आहे. मात्र ही फक्त चर्चाच असल्याचं नितीन पटेल यांनी स्पष्ट केलं. यामध्ये तथ्य नाही, असं ते म्हणाले. दरम्यान, सरदार पटेल ग्रुपचे प्रमुख लालजीभाई यांनी नितीन पटेल यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केलीय. ही लालजीभाईंची वैयक्तीक इच्छा असल्याचं नितीन पटेल यांनी स्पष्ट केलंय. 

सोमवारी सुटणार प्रश्न!

नितीन पटेल नाराज असले तरी या मुद्द्यावर समाधानकारक उत्तर सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजप मुख्यालयात सोमवारी एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ज्या बैठकीला मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उपस्थित राहणार आहेत. नितीन पटेल यांच्याविषयी या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. 

नितीन पटेलांची नाराजी दूर झाली नाही तर???

भाजपला नितीन पटेलांची नाराजी दूर करण्यास अपयश आलं आणि हार्दिकच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाजपला गुजरातची सत्ता गमवावी लागू शकते. नितीन पटेल यांच्यापाठी 17 आमदार असल्याचं कळतंय. किमान 10 आमदारांना सोबत घेऊन जरी नितीन पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसला गुजरातमध्ये सत्ता स्थापन करता येऊ शकते. 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या