कोण आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी?

कोण आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी?

भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यांच्या अटकेची मागणी केली जातेय. मात्र हे मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी नेमके आहेत कोण?

-संभाजी भिडे गुरुजी या नावाचे ते प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर असल्याचं कळतंय.

-संभाजी भिडे यांचं वय 80 वर्षे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे.

-न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम ए केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते, असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतंय. 

-संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते, मात्र त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी  श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. 1984 साली ही संघटना स्थापन झाल्याचं श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलंय.

-श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान म्हणजे प्रतिसंघ होता, संघाच्या उपक्रमांना पर्यायी उपक्रम त्यांनी सुरु केले, असं सांगितलं जातं.

-संभाजी भिडे पायात चप्पल घालत नाहीत. ते अनवाणी चालतात. प्रवास करताना सायकलने किंवा एसटीने प्रवास करतात.

-श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेतील प्रत्येकाला धारकरी असं म्हणतात

-मीरज दंगलीवेळी संभाजी भिडेंच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानवर आरोप झाले. आर. आर. पाटील यांनी संभाजी भिडे यांची अटक टाळली, असं सांगितलं जातं. दरम्यान, भाजप सरकार आल्यानंतर 5 जुलै 2017 रोजी मीरज दंगल प्रकरणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह 51 जणांवरील गुन्हे सरकारने मागे घेतले.

-यंदाच्या पालखीत शस्त्रं घेऊन शिरल्याचा आरोप श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानवर झाला होता. याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी झाली होती

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितलं होतं की, “भिडे गुरुजी मला आदेश सोडतात.” त्यामुळे मोदी त्यांना गुरु मानतात, असंही म्हटलं जातं.

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी भिडे यांची चांगलीच जवळीक आहेत. ते संभाजी भिडे यांचा आशीर्वाद घेतात, असं वेळोवेळी दिसून आलं आहे.

-राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले संभाजी भिडे यांना मानतात. खंडणीसाठी उदयोजकाला मारहाण केल्याचा आरोप जेव्हा उदयनराजेंवर होता. तेव्हा उदयनराजेंचा अटक झाली तर महाराष्ट्र पेटेल, असा इशारा संभाजी भिडे यांनी दिला होता. 

-बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषणला राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता. तेव्हा सांगलीत आयोजित कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

-अरबी समुद्रातील शिवस्मारकास संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. शिवरायांशी संबंधीत ठिकाणीच, प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवस्मारक बांधावे, अशी त्यांची मागणी आहे

-पुणे विद्यापीठाचं नामकरण पुण्यश्लोक श्रीजिजामाता विद्यापीठ करावं, अशी त्यांची एक मागणी आहे

-रायगडावर 32 मणाचं सोन्याचा सिंहासन उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यासाठी सध्या मोहीमही सुरु आहे

Google+ Linkedin