Maharashtra l बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या नावाने आता राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड यांचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
वाल्मिक कराड कोण? भाजप आमदाराचा थेट सवाल :
मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहे? हा प्रश्न भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत उपस्थित करताच सभागृहात वातावरण तापले आहे. विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा सुरू असताना मुनगंटीवार यांनी प्रशासन आणि मंत्रिमंडळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही, हे दुर्लक्ष का? असा सवाल करत त्यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले.
सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले, “लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, याबाबत 12 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्ताव पाठवला होता. 37,958 हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले आहे, पण प्रशासन म्हणते की पंचनाम्याचे आदेश दिलेच नाहीत! नियमांनुसार हे आदेश द्यायला हवे होते. मग मंत्रालयातील हे नवे ‘वाल्मिक कराड’ कोण आहेत? जे नियम मोडून निर्णय घेत आहेत?”
GR नुसार हा निर्णय मंत्रिमंडळात घेणे आवश्यक आहे. तो न घेता पंचनामेच झाले नाहीत, याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.
Maharashtra l अधिकाऱ्यांना दगड, माती खायला घाला – मुनगंटीवारांचा संताप :
मुनगंटीवार पुढे म्हणाले, “प्रशासनाकडे मागील वर्षीच्या आणि यावर्षीच्या पिकांचे रेकॉर्ड असते. यावरून नोंदी घेऊन नुकसानभरपाई दिली जाऊ शकते. शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपयांची भरपाई मिळणार का? जो अधिकारी नुकसान भरपाई नाकारतो, त्याला कधीही भात द्यायचा नाही, त्याने माती आणि गोटे खायला हवेत. लाखो रुपयांचा पगार घेणारे अधिकारी शेतकऱ्यांचे अर्ज थांबवतात, अशा अधिकाऱ्यांना शोधले पाहिजे.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत. मंत्रालयात कोणते अधिकारी अशा प्रकरणांत भूमिका घेत आहेत? हे शोधून काढावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली. यामुळे सरकारसाठी हा मुद्दा आता अधिक तापदायक ठरू शकतो.