Shivsena MNS Unity | राज्यातील मराठी अस्मितेच्या लढ्यात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातील जनआंदोलनामुळे फडणवीस सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला, आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय मेळावा पार पडला. मात्र, या ऐतिहासिक एकत्र येण्यामुळे ठाकरे गट आणि मनसे युती होईल का, यावर अद्याप साशंकतेचे सावट आहे.
राज ठाकरे यांची सावध भूमिका :
उद्धव ठाकरे यांनी भाषणात ठामपणे सांगितले की, “आम्ही एकत्र आलो आहोत, आणि आता एकत्रच राहणार आहोत.” त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे अप्रत्यक्षपणे कौतुक करत सांगितले, “राजने इतकी चांगली मांडणी केली की आता माझ्या भाषणाची गरज उरली नाही.” त्यामुळे उद्धव ठाकरे यांची युतीसाठी मनापासून इच्छा असल्याचे स्पष्ट झाले.
उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करताना राज ठाकरे यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका घेतली. त्यांनी भाषणात मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा उल्लेख केला, पण युतीबाबत कोणताही थेट उल्लेख टाळला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे थेट कौतुक केले नाही आणि यामुळेच राजकीय जाणकारांना ही युती ‘केवळ व्यासपीठापुरती’ नव्हे ना? असा प्रश्न पडतो.
Shivsena MNS Unity | युतीसाठी उद्धव ठाकरे उत्सुक :
विजयी मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता, मात्र अजेंडा होता ‘मराठीचा’. त्यामुळे हे केवळ भाषिक अस्मितेचे एकत्र येणे होते की राजकीय समीकरणांची सुरुवात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अनेकदा युतीची इच्छा व्यक्त केली, पण राज ठाकरे यांची भूमिका यावर निर्णायक ठरणार आहे.
राजकारणात ‘सिग्नल’ महत्त्वाचे असतात, पण या मेळाव्यात राज ठाकरे यांनी फारसे स्पष्ट संकेत दिले नाहीत. त्यामुळे भविष्यात मनसे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवतील का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.