WPL Final 2025 l महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आज (15 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून मुंबई इंडियन्सचा हा दुसरा अंतिम सामना आहे.
खेळपट्टीचा अंदाज आणि नाणेफेकीचा महत्त्वाचा निर्णय :
ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने चाहत्यांना मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये येथे झालेल्या तीन सामन्यांमध्ये सरासरी धावसंख्या 197 राहिली आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स 7 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दिल्लीने 4 वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबईने 3 वेळा बाजी मारली आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दोनदा भिडले असून दोन्ही वेळा दिल्लीने विजय मिळवला. त्यामुळे अंतिम सामन्यातही दिल्लीचा संघ प्रबळ असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू :
दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य खेळाडू :
शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मारिजाने कॅप, जेस जोनासन, सारा ब्राइस, निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी
मुंबई इंडियन्सचे संभाव्य उमेदवार :
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक