Zara Flagship Store l मुंबईतील फॅशनप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेले ‘झारा’चे दक्षिण मुंबईतील आलिशान स्टोअर २३ फेब्रुवारीपासून बंद झाले आहे. जवळपास आठ वर्षांपूर्वी, हे स्टोअर भारतातील सर्वात मोठे शोरूम म्हणून सुरू झाले होते. पण आता, महिन्याचे भाडे आणि विक्रीचे गणित जुळत नसल्याने ते बंद झाल्याचे समजते.
ऐतिहासिक इमारतीमधील स्टोअर :
दक्षिण मुंबईतील हे स्टोअर, इस्माईल नावाच्या ऐतिहासिक इमारतीत होते. तब्बल ५१,३०० चौरस फूट आणि पाच मजल्यांवर हे दालन पसरलेले होते.
‘झारा’ने जगभरातील नवीन फॅशन या स्टोअरमधून उपलब्ध करून दिली होती. हे स्टोअर सुरू करण्यापूर्वी, स्थानिक वास्तुविशारदांनी झाराच्या (Zara) स्वतःच्या आर्किटेक्चर टीमसोबत काम केले होते.
Zara Flagship Store l भाडेकरार आणि व्यवसायाचे गणित :
या स्टोअरचे वार्षिक भाडे ३० कोटी रुपये होते. सुरुवातीला पाच वर्षांच्या करारावर ते घेण्यात आले होते. हा देशातील एका स्टोअरसाठीचा सर्वात मोठा भाडेकरार होता, जो मूळात २१ वर्षांसाठी होता. मूळ कंपनी इंडिटेक्स आणि टाटा समूहाच्या ट्रेंट लिमिटेड (Trent Limited) यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्टोअर चालवले जात होते. मात्र, अवघ्या आठ वर्षांत हे स्टोअर बंद झाले आहे, आणि फॅशन जगतात याची चर्चा सुरू आहे.