शरद पवारांना अचानक काय झालं?, डॅाक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये हा प्रकार घडला. शरद पवार यांना अचानक त्रास जाणवू लागला, त्यामुळे जागेवरच डॉक्टरांनी पवारांची तपासणी केली. (Ncp chief Sharad pawar health update latest marathi news)

नेमका काय प्रकार घडला?

दिवाळी सणाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब दरवर्षी बारामतीत असते, यंदाही पवार कुटुंब बारामतीत आले आहे. आज सकाळी १० वाजता एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित होते, त्यानंतर दुपारी ४ वाजता विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार विद्यानगरी येथे गेले होते, याठिकाणी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना या गोष्टीची कल्पना दिली. सुळे यांनी तात्काळ बैठकीच्या ठिकाणी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रमेश भोईटे डॉक्टर सनी शिंदे यांना बोलावलं आणि शरद पवार यांची तात्काळ तपासणी केली. यावेळी श्री पवार यांचा ईसीजी देखील काढण्यात आला.

डॅाक्टरांनी काय सांगितले?

शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सर्वांनाच काळजी वाटत होती, त्यामुळे त्यांना काय झालंय असा प्रश्न देखील सर्वांना पडला होता. डॅाक्टरांनी याचं कारण सांगितलं आहे. सततच्या कार्यक्रमामुळे आणि विश्रांती न घेतल्यामुळे शरद पवार यांना थकवा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पवार यांचे उद्या होणारे पुरंदर तालुक्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार अस्वस्थ आणि पडद्यामागे मोठ्या घडामोडी-

एकीकडे शरद पवार यांची तब्येत बिघडली असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काही घडामोडी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्याविरोधात बंड करुन भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांना नुकताच डेंग्यू झाला होता. आजारातून ते पूर्णपणे बरे झाली नसल्याची माहिती आहे. अशातच अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अमित शहांना भेटण्यापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.

कधी झाली अजित पवार-शरद पवार भेट-

शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याची माहिती आहे. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पुणे शहरात शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्वजण एकत्र आले होते अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली त्यामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या वाचा- www.thodkyaat.com वर क्लिक करा