”बाळासाहेब मला माफ करा, शेवटच्या क्षणी मी तुम्हाला भेटू शकलो नाही”

मुंबई | आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. अनेक राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील एक ट्विट केलं आहे. काही वर्षांपूर्वी राणे शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडले होते.

आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने नारायण राणेंनी (Narayan Rane) दोन पानी पत्रक लिहलं आहे. त्यांनी ते ट्विट देखील केलं आहे. शेवटच्या क्षणी मी तुम्हाला भेटू शकलो नाही. याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे. साहेब मी आपल्याला शेवटचा नमस्कार देखील करू शकलो नाही मला माफ करा, असं त्यांनी त्या पत्रकात लिहलं आहे.

मी जो काही आहे ते बाळासाहेबांच्यामुळं आहे. हे सांगायला मला कधीही कमीपणा वाटणार नाही. पक्ष चालवताना त्यांनी प्रत्येकाला प्रेम दिलं आहे. त्यामुळे ती माणसं त्यांच्या जीवावर उदार व्हायला कधीच मागेपुढे पाहत नसत. अशा वागणुकीमुळे ते फक्त पक्षाचे नाही तर संपूर्ण राज्याचे लाडके होते, असं देखील राणेंनी पत्रात नमूद केलं आहे.

त्यांनी मला आई-वडिलांइतकंच प्रेम केलं आहे. सेना सोडून बाहेर पडल्यानंतर देखील तुम्ही मला दोन वेळा फोन केले होते. तुमच्या ह्रदयाचा मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा?, असा भावनिक प्रश्न देखील राणेंनी विचारला आहे. त्यांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल लिहताना माझा कागद संपून जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेवटच्या दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मला वाटलं नेहमीसारखं ते मृत्यूला चकवा देऊन बरे होऊन परत येतील. ते मात्र आपल्या सगळ्यांना सोडून गेले, असं म्हणत आपल्याला त्यांना भेटता न आल्याचं दु:ख राणेंनी पत्रात नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More