मुंबई | शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) राज्य सरकार मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. या वेळी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) या देखील उपस्थित होत्या. ‘लेक लाडकी योजना’ यावर चर्चा करत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा केली होती. दरम्यान हा प्रस्ताव सादर करत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच राज्याचे दोन्ही उपुख्यमंत्री यांनी या योजनेला मंजुरी दिली असून, 1 लाख 1 हजार अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे. त्यामुळे आजपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
काय आहे राज्य सरकारची लेक लाडकी योजना?
महाराष्ट्रातील गरीब घरातील मुलींना याचा फायदा होणार आहे. गरीब मुलींना सरकार अर्थिकरित्या मदत करणार आहे. विशेषत: पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देखील दिले जाणार आहेत.
मुलगी इयत्ता पहिलीमध्ये असल्यास तिला 4000 रुपयांची मदत होणार आहे. जर मुलगी सहावीत गेल्यानंतर तिला 6000 रुपयांची मदत केली जाणार आहे. अकरावीमध्ये गेल्यावर 8000 रुपये तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या खात्यावर 75 हजार रुपये जमा केला जाणार आहेत. सरकार टप्प्याटप्प्याने ही मदत करणार आहे.
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी… मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेचा लाभ कुणाला?
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. मुली जुळ्या असतील तर त्यांना स्वतंत्ररित्या या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.