पुणे: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे. काही नेते शरद पवार यांना सपोर्ट करताना दिसत आहेत तर काही नेत्यांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहीर केला आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्यासोबत होते मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. ट्विट करुन त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला.
आता अमोल कोल्हे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यांनी यासंदर्भात बोलून दाखवलं आहे, त्यामुळे या विषयाची आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला, त्यानंतर आता ते मुंबईत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांना भेटून ते आपला राजीनामा त्यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.