‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Congress | कॉँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती. यानंतरही पक्षात पडझड सुरूच आहे. आता अजून एका बड्या नेत्याने पक्षाला धक्का देत मोठा निर्णय घेतला आहे.

कॉँग्रेसला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan)हे काही दिवसांपासून नाराज होते. ते उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रही होते.

मात्र, कॉँग्रेसने या जागेवर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान हे प्रचंड नाराज झाले होते. निवडणुकीमुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशात कॉँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.

मुंबई काँग्रेसमधील बडा नेता नाराज

कॉँग्रेस (Congress) नेते नसिम खान यांना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती.त्यांनी ही जबाबदारी आपण पार पाडली असल्याचं म्हटलं आहे.

नसिम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत मोठा खुलासा केला.मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते.मी पक्षाचा आदेश मानून लगेच तयारी सुरु केली होती. असं नसीम खान यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवरून नाराजी

पुढे ते म्हणाले की, (Congress) वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. कॉँग्रेसने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे?, असा सवाल करत नसीम खान यांनी नाराजी जाहीर केली आहे.आता याचा फटका वर्षा गायकवाड यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title –  Congress leader Naseem Khan resigns as star campaigner