भाजपच्या सर्व नेत्यांचा पत्ता कट, संघाचा ‘हा’ माणूस पुण्यातून लोकसभा लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यापाठोपाठ आता लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरु झाली आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मात्र मध्यंतरी भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजप काही बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, या चर्चा किती खऱ्या किती खोट्या? हे माहीत नाही, मात्र आता पुणे लोकसभेच्या जागेवरुन पुन्हा एकदा नवी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं नुकतंच निधन झालं. तेव्हापासून पुण्याची जागा रिक्त आहे. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्यानं या जागेवर पोटनिवडणूक सुद्धा झाली नाही. बापट यांच्यानंतर पुण्याचा खासदार कोण होणार?, याची पुणेकरांना उत्सुकता आहे. बापट भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, त्यामुळे इथं भाजप प्रबळ असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पुण्यातून खासदारकीसाठी इच्छुकांची संख्या देखील भाजपमध्ये जास्त आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह गिरीष बापट यांची सून स्वरदा बापट, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संजय काकडे यांची नावं चर्चेत असतात, याशिवाय इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र भाजपच्या या नेत्यांचा, वा कार्यकर्त्यांचा विचार होण्याऐवजी भाजपनं आता या ठिकाणी संघाचा माणूस उमेदवार म्हणून देण्याची तयारी चालवल्याची चर्चा आहे.

कोण आहे हा संघाचा माणूस?

काहीही करुन भाजपला यंदाच्या लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपकडून मोठी रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपने यावेळी पुण्यातून संघाचा माणूस उमेदवार म्हणून देण्याची तयारी चालवल्याची जोरदार चर्चा आहे. हे संघाचं नाव म्हणजे सुनील देवधर… भाजपने सुनील देवधर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील देवधर यांनी तयारी देखील सुरु केली आहे. त्यांनी मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ते लवकरच शहरातील विरोधी पक्षाच्या आमदारांच्या देखील भेटी घेणार असल्याची माहिती आहे.

कोण आहेत सुनील देवधर?

त्रिपुरामध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात सुनील देवधर यांचा मोठा वाटा मानला जातो. अडीच दशकं डाव्यांच्या प्रभावात असलेली सत्ता त्यांनी संपुष्टात आणली. देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी ईशान्य भारतात एक तप म्हणजेच तब्बल 12 वर्षे काम पाहिलं. आता देवधर यांच्या नावाची पुणे लोकसभेसाठी चर्चा सुरु आहे. याआधी देखील बाहेरील नावांची चर्चा होती, मात्र बाहेरील माणूस लादल्याचा प्रचार होईल या भीतीनं ती नावं मागं पडली असावीत. तुलनेनं सुनील देवधर यांच्याबाबत मात्र तसा प्रचार करता येणार नाही, कारण देवधर यांचा जन्म पुण्याचाच आहे…

कधी मोदी, तर कधी फडणवीसांची चर्चा-

दरम्यान, सुनील देवधर यांच्या नावापूर्वी पुणे लोकसभेसाठी इतरही काही नावांची चर्चा झाली, यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश होता. मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यादृष्टीने चाचपणी देखील सुरु असल्याची माहिती होती, मात्र या कालंतराने या चर्चा बंद झाल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नावही पुणे लोकसभेसाठी घेतलं जाऊ लागलं होतं. भाजप आपल्या बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या रणनीतीचाच हा एक भाग असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

पुण्याला सध्या खासदार नाहीये… पुण्यात भाजपची दुसरी फळी आहे, मात्र त्यातील कुणाला खासदारकीचं तिकीट द्यायचं… की बाहेरुन उमेदवार आयात करुन त्याला उभं करायचं? भाजपच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला तयार नाही. अशा परिस्थितीत भाजपने पुण्यात खरंच बाहेरचा उमेदवार दिला… तर स्थानिक नेते फक्त सतरंज्या उचलायला आहेत का?, असा प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होईल… जाताजाता एक प्रश्न तुमच्यासाठी… पुण्याचा खासदार कोण असावा?, तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा…

महत्त्वाच्या बातम्या-