विकासकामांचा गिरीशभाऊंचा ध्यास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | लोकप्रतिनिधी म्हणून श्री. गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली. लोकांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प आणले. प्रकल्पांची फक्त घोषणा न करता, ही कामे पूर्णत्वास कशी जातील त्याचप्रमाणे कामाचा दर्जाही चांगला कसा राहील यासाठी स्वत: त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. प्रकल्प राबवत असताना येणाऱ्या समस्यांबाबतही त्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेतले. त्यांनी केलेल्या विकासकामांपैकी पीएमआरडीएची स्थापना, पीएमआरडीएच्या माध्यामातून केलेली विकासकामे, वाहतूक समस्या कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय प्रामुख्याने पुणे मेट्रोची मंजुरी, रिंगरोड तसेच पुणे विमानतळ विस्तारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या शहर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्तवाचे आहेत.

श्री. गिरीश बापट यांनी पाच वेळा विधानसभेत कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुण्याचे आमदार म्हणून त्यांनी पुणे शहराचे आणि परस्पर परिसराचे वेगवेगळे विषय धसास लावले. मुंबई महानगराचा विकास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने एमएमआरडीएची स्थापना केली होती. मुंबई खालोखाल पुणे हे राज्यातलं महत्त्वाचे शहर आहे. पुढील काळात पुणे एक विकसित महानगर होईल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएच्या धर्तीवर त्यांनी पीएमआरडीएची म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा अनेक वर्षे सरकारकडे आग्रह धरला. मी विधानमंडळाचे वार्तांकन करताना आणि नंतर विधानसभा अध्यक्ष मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही काम करत असताना, गिरीशभाऊंना अनेक वेळा विधानमंडळात पीएमआरडीएसाठी आपल्या भाषणात जोशपूर्ण आग्रह धरताना पाहिलय. पुणे परिसराचा भविष्यात सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम या विषयावर विधानसभेत बोलत. आज संपूर्ण देशात पीएमआरडीए रिजन हे सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेलं त्याचबरोबर पुणे महापालिका हे देशात सर्वाधिक क्षेत्र असलेलं महानगराचे क्षेत्र आहे. या दृष्टिकोनातून गिरीश भाऊंनी महाराष्ट्रातच एक महत्त्वाचा हा विकासाचा परिसर म्हणून या भागाकडे पहावा यासाठी आग्रह धरला होता. त्यात मला त्यांची दूरदृष्टी दिसून येते. कारण या पुढच्या काळात महत्त्वाच्या कंपन्या, महत्त्वाच्या आस्थापना, शैक्षणिक केंद्र, व्यावसायिक क्षेत्र म्हणून ह्या पट्ट्यात एका मोठ्या परिसराचा विकास होत असल्याचे आपल्याला दिसून येते. बापट साहेबांनी पीएमआरडीएचा आग्रह धरल्याने 2014 साली मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय महत्वाचा विषय म्हणून पीएमआरडीएच्या स्थापनेसाठी लगेचच मान्यता दिली.

पीएमआरडीएचे पहिले अध्यक्ष म्हणून पालकमंत्री या नात्याने गिरीशभाऊ बापट यांची नियुक्ती झाली. या आधीच्या काळात मी या सर्व घडामोडी जवळून पाहिलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेंव्हा पीएमआरडीएचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा मंत्री असावेत, की कॅंाग्रेसचे मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष असावेत यात खूप वाद विवाद झाले. आणि त्या वादात पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी स्थापन होणारी ही एक महत्त्वाची यंत्रणा उभी नाही राहू शकली. ही दुर्दैवाने पुण्याच्या विकासासाठी अतिशय मारक ठरलेली गोष्ट होती. पण गिरीश भाऊंच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत देवेंद्रजींनी ज्या धडाडीने निर्णय घेतले त्याचा एक भाग म्हणून पीएमआरडीए अस्तित्वात आली. पुढच्या काळात पीएमआरडीएचा विकास जसजसा होईल तसतसं गिरीश भाऊंची ही कृती किती महत्त्वाची होती आपल्या लक्षात येईल. पीएमआरडीची स्थापना करताना त्यांनी अधिकाऱ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढच्या किमान पन्नास वर्षाचा आराखडा आपण तयार केला पाहिजे अशी सूचना केली. त्यात कटाक्षाने लोकांची व्यवस्थित सोय कशी होईल हे पहिले. हे करत असताना वाहतुकीच्या सोयी, आरोग्य,शाळा, रस्ते, पाणी, कचरा या सर्व प्रकल्पांवर लक्ष देण्याचा प्रत्येक वेळी आग्रह धरला. याची अंमलबजावणी करायला अधिकाऱ्यांना जवळपास भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही.

पुण्यात इंग्रज राजवटीत कोरेगाव पार्क आणि डेक्कन जिमखाना या टाउनशिप अस्तित्वात आल्या. त्यानंतर त्यात धर्तीवर पीएमआरडीए मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी टाऊनशिपच्या कल्पना मांडून स्वतंत्रपणे चांगला विकास कसा करता येईल, याच्यासाठी धोरण आखायला सांगून बापट साहेबांनी आग्रह करून ते काम करून घेतलं. पीएमआरडी मार्फत रस्त्यांचे वेगवेगळे जाळ तयार करायचा, त्याचबरोबर पीएमआरडीएचा रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई पासून निघालेले किंवा वेगवेगळ्या भागातून वरून येणारी पुणे शहरातून जाणारी अवजड वाहने शहरातून आणि शहराला लागून असलेल्या रस्त्यांवरून जातात. वास्तविक त्यांना या परिसरात येण्याची काहीच गरज भासत नाही. ही वाहतूक टाळल्यास पुणे शहरात येणारा मोठा वाहतुकीचा लोड टाळता येऊ शकतो, असं लक्षात आल्यानंतर पीएमआरडी कडून एक वेगळा रिंग रोड करण्याची योजना आखण्यात आली. त्या रिंग रोडचे पण नियोजन झालं. तो एक महत्त्वाकाक्षी प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. त्यातून वाहतुकीचा खोळंबा टाळता आला असता. शहरात येणाऱ्या मोठ्या गाड्या टाळून ही वाहतूक अन्यत्र वळवल्यास शहरातल्या लोकांना वाहतुकीत खूप मोठा फरक झालेला दिसून आला असता. भविष्यात ते नक्की घडेल.

पुणे हे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आयटीचं मोठं केंद्र म्हणून गेल्या काही वर्षात उदयाला आलं. पण आयटीच्या उदयाबरोबरच शहरातले वाहतूक, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि त्यानुसार या प्रश्नांना ऍड्रेस करणं, त्यावर उपाययोजना करणे ही आवश्यक गोष्ट होती. मात्र याबाबत दुर्दैवाने ठोस निर्णय झाले नव्हते. बापट साहेब पालकमंत्री असताना मी त्यांच्या काही कामांचा समन्वय करत होतो. यामुळे हिंजवडीतील आयटी पार्क असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मला माहिती देऊन आमच्या भागातील महत्वाच्या प्रश्नांसाठी बापट साहेबांनी लक्ष घालावे अशी विंनती केली.

त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आलं की, अनेक वर्षांपासून यात कोणी व्यवस्थित लक्ष दिले नसल्याने हे प्रश्न अतिशय चिघळलेले आहेत. पुणे शहरातून प्रामुख्याने कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागातून हिंजवडीत जायला ट्रॅफिक जाम मध्ये दोन ते अडीच तास लागत होते. हिंजवडीला कामाला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लोक जर दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम मध्ये अडकत असतील, तर दुर्दैवाने याच्यासारखी दुसरी गंभीर गोष्ट असू शकत नाही. या लोकांचा वेळ अर्धा तास ते ४० मिनिटांवर आला तर तेवढाच वेळ ते आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी खर्च करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यावेळी ते म्हणाले होते. यासाठी आपण याच्यात लक्ष घालून जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल याची खबरदारी घेऊ असं बापट साहेबांचे म्हणन होत. हिंजवडी आयटी पार्क असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर त्यांनी या दृष्टिकोनातून खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू केले. या कामांबाबत विविध पातळीवर मी फॉलोअप करून रस्ते, मेट्रो आणि अन्य कामांसाठी प्रयत्न केले.

येथील वाहतूक समस्या करण्यासाठी बापट साहेबांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे शहरात पहिल्यांदाच हिंजवडी ते शिवाजीनगर अशी मेट्रो संकल्पना मांडली. ही संकल्पना फक्त मांडली नाही तर याला मूर्त रूप देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माननीय फडणवीस साहेबांनी बापट साहेबांचा आग्रह न मोडता या मेट्रो मार्गाला परवानगी दिली. लवकरच या मार्गावर मेट्रो धावताना आपल्याला दिसेल.

वाहतुकीच्या समस्यांबरोबरच त्या भागातील सुरक्षा व्यवस्था, कचरा प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आदी विषयांवर काम करणे सुरु केले. येथील मोठ्या गाड्या सगळ्या बेभरवशाच्या पातळीवर पार्क केल्या जात होत्या. त्याच्यासाठी योग्य तो समन्वय करणे आवश्यक होतं. बापट साहेबांना मी याबाबतची सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही हिंजवडीतच आयटी पार्क असोसिएशन बरोबर सर्व संबंधित एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पीएमआरडी आणि महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांना बोलवून बैठका लावल्या. एक दोनदा नव्हे तर किमान चार वेळा बापट साहेब हिंजवडी मध्ये या कामासाठी स्वतः वेळ देऊन आले. यासंबंधित सर्व आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना या बैठकांसाठी बोलावून घेतले. अशा प्रकारची पहिली बैठक पालकमंत्र्यांनी इतक्या वर्षात या भागात केली. त्यातून हिंजवडीला कनेक्ट करणारे वेगवेगळे रस्ते, मेट्रोचा प्रकल्प या वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात झाली. आज आपण हिंजवडीच्या पट्ट्यात ही विकास काम वेगाने पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत.

त्यामुळे एक पुणे शहराचा हा अनेक वर्ष प्रलंबित असलेला, अडकून पडलेला विकास बापट साहेबांच्या आग्रही नेतृत्वामुळे पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. पुणे शहरात असलेला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो असावी हा सुद्धा विषय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात प्रलंबित होता. मात्र सत्तेत आल्यानंतर माननीय देवेंद्रजी यांनी जणू काही ‘पुणे मेट्रोचा’ आराखडाच तयार केला. यामध्ये पण बापट साहेबांचा महत्वाचा सहभाग होता. बापट साहेबांनी त्याच्यात जी काय महत्त्वाची भूमिका बजावली त्याला मी साक्षीदार आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पुणे मेट्रोसाठी गिरीश बापट कमिटी स्थापन करून याचा अहवाल द्यायला सांगितला. शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या बापट साहेबांनी एक महिन्यात त्याचा रात्रंदिवस अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर केला. यासाठी आम्ही रात्री एक- एक, दोन -दोन वाजेपर्यंत मुंबईच्या त्यांच्या शासकीय बंगल्यावर केलेल्या चर्चांना मी साक्षीदार आहे. तो अहवाल झाल्यानंतर दिल्लीतल्या बैठका, वेगवेगळ्या स्तरावरच्या मंत्रालयीन परवानगी यासाठी फडणवीस साहेबांनी विशेष प्रयत्न केले. हा समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री म्हणून बापट साहेबांनी जी काही धडपड केली यातून एक नेतृत्व कसं विकासाचं काम करू शकतो त्याचा एक खूप मोठा मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मला जाणवले. अर्थमंत्री असताना अरुण जेटली यांच्याबरोबरची बैठक असो, त्याचप्रमणे पुढे जाऊन गडकरी साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रातल्या परवानगी घेणे, राज्यातल्या सर्व गोष्टी देवेंद्रजींकडे आग्रहाने मागून त्यांच्याकडून तयार करून घेणे, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व आवश्यक तांत्रिक, आर्थिक या सगळ्या बाबींची पूर्तता तातडीने करून घेतल्याने पुण्याची मेट्रो आज उभी राहिलेली दिसते. यथावकाश तिचा विकास जसा होत राहील तशी पुण्यासाठी, पुणेकरांसाठी जवळपास २५ वर्ष प्रलंबित असलेली ही मेट्रो ज्यावेळेस धावायला लागेल, त्यावेळेस आपल्याला बापट साहेबांनी हे आपल्याला काय करून दिले त्याची खरी किंमत कळेल.

पुण्याचे खासदार आणि त्याआधीही पालकमंत्री म्हणून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण असो वा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा द्यायचं असो त्यात समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बापट साहेबांनी निभावली. महापालिकेची मागची निवडणूक झाल्यानंतर आम्ही दिल्लीत गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बापट साहेबांनी आयोजित केली. त्यात सर्व विमानतळाशी संबंधित अधिकारी, विभाग यांचा समावेश होता. पुण्याच्या विमानतळावर जवळपास वार्षिक एक कोटीपर्यंत प्रवासी संख्या कोविडच्या आधी वाढली होती. या सगळ्या गर्दीला समन्वयाने व्यवस्थित सोयी सुविधा देण्यात यावे यासाठी जागेची गरज होती. आणि ती जागेची गरज बापट साहेबांनी गेल्या सहा वर्षात जे काम केलं तयार झाली. आज पुणे शहराच्या विमानतळाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं यात गडकरी साहेब आणि बापट साहेबांची फार मोठी भूमिका आहे ती आपल्याला पुणेगारांनी कायम लक्षात ठेवावे अशीच…..

सुनील माने, भाजप पुणे शहर चिटणीस

महत्वाच्या बातम्या-