मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या नावावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. अर्थात शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याची कोश्यारींची ही पहिली वेळ नसली तरी त्यांच्यापाठोपाठ भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून पण शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली.
विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीसांच्या सरकारला धारेवर धरलं. भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार टीका केली होती. मात्र आता एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोलेच शिवरायांबद्दल असं काही बोलून गेले की राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळू शकते.
राज्यापाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंची तुलना शिवरायांसोबत केली. यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि रावसाहेब दानवे यांनीपण शिवरायांबद्दल बादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दावा नाना पटोलेंकडूनच करण्यात आला होता. मात्र या सगळ्यानंतर आता नाना पटोलेंनीच शिवरायांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, असं मोठं वक्तव्य नाना पटोले करून गेले आणि यामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते. त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असं मोठं वक्तव्य पटोलेंनी केलंय.
नाना पटोले हे अकोल्यात कुणबी समाजाच्या परिचय मेळाव्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे असल्याचं मोठं वक्तव्य केलं. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवरायांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य ऐकायला मिळतायत. वारंवार होणाऱ्या अशा वक्तव्यांवर नेतेमंडळींसोबतच सामान्य जनतेकडूनही विरोध दर्शवला जातोय. भाजप नेत्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी तीव्र नाराजी दर्शवली होती.
गेल्या महिनाभरात जवळपास चार-पाच भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे अजाणतेपणी नसून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे भाजपने रचलेले सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला होता. शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात सध्या वादळ उठलेलं असताना बोलता बोलता नाना पटोलेही असं काही बोलून गेलेत यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटू शकतं.
महत्त्वाच्या बातम्या-